अलप्पुझा: प्रख्यात तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) एका गरीब विद्यार्थीनीच्या मदतीसाठी पुढे आला आहे. (Allu Arjun help poor student). बारावीत 92 टक्के गुण मिळूनही तिला तिचे शिक्षण सुरू ठेवता आले नाही. अलाप्पुझाचे जिल्हाधिकारी कृष्णा तेजा (Alappuzha Collector Krishna Teja) यांनी विद्यार्थिनीची माहिती देऊन अल्लू अर्जुन याला वैयक्तिक विनंती केली होती. त्यानंतर अल्लू अर्जुनने 'वुई फॉर अलेप्पी' (we for alleppey) प्रकल्पाचा भाग म्हणून तीच्या नर्सिंग कोर्सचा सर्व खर्च उचलण्याचे मान्य केले आहे.
![अलाप्पुझाचे जिल्हाधिकारी कृष्णा तेजा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/collector_1111newsroom_1668153765_308.jpg)
जिल्हाधिकाऱ्यांकडे मदत मागितली - विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबाने काही दिवसांपूर्वी कृष्णा तेजा यांची भेट घेऊन तिचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत मागितली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून तिला नर्सिंग कोर्सला प्रवेश मिळवून दिला. मात्र विद्यार्थिनीची अभ्यासक्रमाची फी भरण्याची आर्थिक क्षमता नव्हती. त्यानंतर कृष्णा तेजाने अल्लू अर्जुनशी संपर्क साधला आणि चार वर्षांच्या अभ्यासक्रमाची फी आणि वसतिगृहाची फी देण्याचे मान्य केले.
अशा प्रकारे केली मदत - आपल्या फेसबुक पोस्टमध्ये कृष्णा तेजाने लिहिले की, "काही दिवसांपूर्वी अलप्पुझा येथील एक विद्यार्थिनी मला भेटायला आली होती. तिने बारावीत ९२ टक्के गुण मिळवले होते. पण तिच्याकडे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी पैसे नव्हते. तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांना 2021 मध्ये कोविड झाला होता. त्यानंतर त्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. मी त्या मुलीच्या डोळ्यातील आशा आणि आत्मविश्वास वाचू शकलो आणि 'वी फॉर अलेप्पी' प्रकल्पासाठी तिला मदत करण्याचा निर्णय घेतला. तिने मला सांगितले की तिची नर्स बनण्याची इच्छा आहे. मेरिट जागांसाठी अर्ज करण्याची वेळ आधीच संपली होती. त्यामुळे आम्हाला किमान मॅनेजमेंट कोट्यातील जागा निश्चित करायची होती. आम्ही अनेक कॉलेजांशी संपर्क साधला आणि शेवटी कट्टनम सेंट थॉमस नर्सिंग कॉलेजमध्ये जागा मिळाली. आम्हाला शोधायचे होते तिच्या चार वर्षांच्या अभ्यासासाठी कोणी एक प्रायोजक आहे का. त्यासाठी मी प्रसिद्ध स्टार अल्लू अर्जुनशी संपर्क साधला आणि त्याने एका वर्षासाठी नव्हे तर चारही वर्षांसाठी खर्च उचलण्यास सहज सहमती दर्शवली. त्यानंतर मी स्वतः जाऊन विद्यार्थिनीला प्रवेश दिला."