चेन्नई (तामिळनाडू) : चेन्नईच्या रोहिणी थिएटरमध्ये प्रसिद्ध अभिनेता अजित कुमार स्टारर 'थुनिवू' चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला चित्रपट पाहून इतका आनंद झाला की त्याने आनंदाच्या भरात पुणतामल्ली हायवेवर संथ गतीने चालणाऱ्या लॉरीवरून खाली उडी मारली. या दरम्यान त्याच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली.
उपचारादरम्यान मृत्यू : दुखापतीनंतर या तरुणाला उपचारासाठी केएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस तपासात मृत चाहता भरत कुमार (19) हा रिची स्ट्रीट, चिंताद्रीपेट येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. कोयंबेडू वाहतूक अन्वेषण विभाग पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. त्याच वेळी, कांचीपुरम नेमिलीमध्ये, अभिनेता अजितच्या चाहत्याने क्रेनवर चढून 30 फूटाच्या अजितच्या कटआउटला हार घातला.
पोंगलचे औचित्य साधून चित्रपट रिलीज : दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अजित कुमार स्टारर 'थुनिवू' चित्रपट आज 11 जानेवारीला रिलीज झाला. पोंगल सणाचे औचित्य साधून हा चित्रपट रिलीज केल्या गेला. या निमित्ताने आज दुपारी एक वाजता एक खास शो दाखवण्यात आला होता. या दरम्यान चित्रपट थिएटर चाहत्यांनी भरले होते. चाहत्यांनी त्यांचा सुपरहिरो अजित कुमार साठी एक प्रकारचा उत्सवच साजरा केला.
दोन सुपरस्टार्सचे चाहते समोरासमोर : 'वारीसु' आणि 'थुनिवू' हे दोन साऊथ चित्रपट आज प्रदर्शित झाले. चित्रपटाचाच्या प्रदर्शना नंतर साऊथच्या दोन सुपरस्टार्सच्या चाहत्यांमध्ये युद्ध सुरू झाले आहे. चित्रपटाचे मुख्य अभिनेते थालापथी विजय आणि अजित कुमार या दोघांचे चाहते चित्रपटासंदर्भात समोरासमोर आले. अजित कुमारच्या चाहत्यांनी विजयच्या 'वरिसु' चित्रपटाचे पोस्टर फाडले, तर विजयच्या चाहत्यांनी अजित कुमारच्या चित्रपट 'थुनिवू' चे पोस्टर फाडले. चाहत्यांचा मारामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.