नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ते तेथे भाजपच्या इतर ज्येष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. मात्र यावेळी खातेवाटपाबाबत चर्चा होणार नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्याचवेळी उद्या किंवा परवा खातेवाटप झालेले असेल, असे सूतोवाच पटेल यांनी यावेळी केले. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, 'मंत्रिमंडळ विस्ताराचा वाद नाही. पवार फक्त भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीत आले आहेत'.
'खातेवाटपाबाबत चर्चा होणार नाही' : प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराचा वाद नाही. अजित पवार फक्त भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीत आले आहेत. यावेळी खातेवाटपाबाबत चर्चा होणार नाही. अजित पवार भाजप श्रेष्ठींना भेटले नव्हते. यानिमित्ताने ते भेटणार आहेत, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
'आमच्यात कुठलाही वाद नाही' : प्रफुल्ल पटेल म्हणाले की, खातेवाटपावरून आमच्यात कुठलाही वाद नाही. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. त्यानंतर अजित पवार आणि सुनिल तटकरे यांच्यासोबत माझी बैठक झाली. आमच्यात गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. मात्र खातेवाटपावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले. आधीची खाती ही शिवसेना आणि भाजपकडे आहेत. त्यांचे कुठले खाते काढून आम्हाला द्यायचे याबाबत गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
अजित पवारांना शिंदे गटचा विरोध : 2 जुलैला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजूनही खातेवाटपाचा तिढा कायम आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री बैठक झाली होती. शिंदे गटाचा अजित पवारांना अर्थ खाते देण्यास विरोध असल्याने खातेवाटपाचा निर्णय लांबणीवर पडत असल्याचे म्हटले जात आहे. त्यासोबतच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर शिंदे गटाने दावा केला असताना राष्ट्रवादी काँग्रेसही त्यासाठी आग्रही असल्याचे समोर येत आहे.
हे ही वाचा :