बेंगळुरू: कर्नाटकातील हिंदू संघटनांनी बेंगळुरूमधील क्लेरेन्स हायस्कूलमध्ये बायबलच्या कथित अनिवार्य शिक्षणाला विरोध केला आहे. रिचर्ड्स टाऊन परिसरात असलेल्या शाळेने प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बायबल वाचन सक्तीचे केल्याचा आरोप आहे. हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते मोहन गौडा म्हणाले की, बायबलचे शिक्षण सक्तीचे करणे हे संविधानाच्या कलम 25 चे उल्लंघन आहे.
ते म्हणाले की शाळेच्या प्रकाशनात असे म्हटले आहे की सर्व मुलांसाठी बायबलचे शिक्षण अनिवार्य आहे. ख्रिश्चन नसलेल्या विद्यार्थ्यांवर धार्मिक ग्रंथ लादणे हे धार्मिक श्रद्धेच्या विरोधात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेही हे उल्लंघन आहे. याबाबत शिक्षणमंत्र्यांकडे तक्रारही करण्यात आली होती. येत्या काही दिवसांत आम्ही न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी ईटीव्ही भारतशी फोनवरील संभाषणात सांगितले की, शाळेत बायबल अनिवार्य करण्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे.
याबाबत ते त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील पाऊल उचलणार आहेत, मात्र, या विषयावर शाळा व्यवस्थापनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. कर्नाटक गेल्या काही महिन्यांपासून जातीय वादात अडकले आहे. गेल्या महिन्यात राज्यातील शाळांमध्ये हिजाब घालण्यावरून वाद झाला होता. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.