मुंबई : Aditya L1: चंद्रयान ३ नंतर इस्रो आता सूर्याविषयी सर्वकाही जाणून घेण्यासाठी आदित्य एल १ यान अंतराळात पाठवत आहे. 'निगार शाजी' ह्या महिला शास्त्रज्ञ या प्रकल्पाचं नेतृत्व करत आहेत. त्यांच्याशी 'ईटीव्ही भारत'नं खास संवाद साधला. या दरम्यान निगार शाजी यांनी त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल माहिती दिली.
शेतकरी कुटुंबात जन्म झाला : निगार शाजी यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबातला. तामिळनाडूच्या थेनकासी जिल्ह्यातील सेंगोटाई हे त्यांचं मूळ गाव. त्यांचे वडील पदवीधर होते, मात्र ते शेती करायचे. तर आई गृहिणी होती. शाजी यांनी सेंगोटाई येथील एसआरएम गर्ल्स स्कूलमध्ये बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी मदुराई कामराज विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी बीआयटी रांची येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये एमई पूर्ण केलं.
दोन्ही मुलं उच्चशिक्षित आहेत : 'शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला इस्रोच्या नोकरीची सूचना मिळाली होती. मी अर्ज केला आणि नोकरी मिळाली', असं निगार सांगतात. निगार शाजी यांचे पती दुबईत मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून काम करतात. त्यांना दोन मुलं आहेत. ते दोघेही उच्चशिक्षित आहेत. मुलानं फ्लुइड मेकॅनिक्समध्ये डॉक्टरेट केली आहे. तो नेदरलँडमध्ये काम करतो. तर त्यांची मुलगी वैद्यकीय व्यवसायात आहे.
'सतीश धवन स्पेस सेंटर' मधून कारकिर्दीला सुरुवात : निगार शाजी यांनी १९८७ मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चं प्रमुख केंद्र असलेल्या 'सतीश धवन स्पेस सेंटर' मधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. येथे काही काळ काम केल्यानंतर त्यांची बंगळुरुमधील 'यूआर राव सॅटेलाइट सेंटर'मध्ये बदली झाली. तेथे त्यांनी विविध पदांवर काम केलं. त्यानंतर त्यांनी आदित्य एल १ च्या प्रकल्प संचालक म्हणून पदभार स्वीकारला.
देशासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या आदित्य एल १ सारख्या प्रकल्पाचा संचालक होण्यापेक्षा समाधानाची गोष्ट कोणती असू शकते? प्रत्येक पायरीवर आव्हानं आहेत. मात्र आता हे आव्हानं अवघड वाटत नाहीत. इस्रोमध्ये महिलांना काम करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. लक्ष्य निवडलं की येथे काम करायला प्रोत्साहन मिळतं. देशभरातील इस्रोच्या केंद्रांमध्ये महिलांबाबत कुठेही भेदभाव किंवा असमानता नाही. येथे आमच्यातील काम आणि क्षमता पाहिली जाते. - निगार शाजी, प्रकल्प संचालक, आदित्य एल १ मिशन
आदित्य एल १ पूर्वी या प्रकल्पांवर काम केलं : इस्रोच्या या मिशनवर काम करण्यापूर्वी निगार शाजी यांनी भारतीय रिमोट सेन्सिंग, कम्युनिकेशन आणि इंटरप्लॅनेटरी सॅटेलाइट्सच्या विविध क्षमतेच्या डिझाइन प्रकल्पांमध्ये काम केलं आहे. त्यांनी इस्रो द्वारे हाती घेतलेल्या भारतीय रिमोट सेन्सिंग उपग्रह रिसोर्ससॅट-2A साठी सहयोगी प्रकल्प संचालक म्हणून काम केलंय. या प्रयोगांमध्ये त्यांनी इमेज कॉम्प्रेशन, सिस्टम इंजिनिअरिंग आणि स्पेस इंटरनेट वर्किंग यासारख्या महत्त्वाच्या पैलूंशी संबंधित शोधनिबंध सादर केले होते.
हेही वाचा :