नवी दिल्ली : अदानींच्या अडचणी कमी होताना दिसत असतानाच आता अदानी समूहाने आपल्या अडचणी कमी करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) ने सोमवारी कर्ज खरेदी कार्यक्रम सुरू केला. या वर्षी जानेवारीमध्ये, अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर, अदानी समूहाने प्रथमच डेट बायबॅक म्हणजेच कर्ज खरेदी सुरू केली आहे.
$130 दशलक्ष पर्यंत बायबॅक: अदानींनी स्टॉक मार्केटला दिलेल्या माहितीनुसार, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) ने जुलै 2024 चे $130 दशलक्ष पर्यंतचे रोखे बायबॅक करण्यासाठी निविदा आमंत्रित केल्या आहेत. कंपनी पुढील चार तिमाहीत समान रक्कम अधिक परत करेल. APSEZ ने सांगितले की त्यांनी 2024 मध्ये पूर्णत्वास जाणाऱ्या $3.375 टक्के मूल्याच्या रोख्यांसाठी बायबॅक कार्यक्रम सुरू केला आहे. अदानींना याचा चांगलाच फायदा होणार आहे. तसेच ग्राहकांनाही यामुळे चांगलाच दिलासा मिळणार आहे.
गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी उचलली पावले : अदानी उद्योग समूहाला हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर खूपच नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे त्यांची पतही मोठ्या प्रमाणावर धोक्यात आली होती. आपली पत राखण्यासाठी त्यांना काही उपाययोजना करणे गरजेचे होते. त्यासाठी अदानींनी काही प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहेत. आपली रोख स्थिती अधिक चांगली असल्याचे सिद्ध करून गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवण्यासाठी अदानी हे पाऊल उचलत आहेत.
अदानी समूहावर हिंडेनबर्गचे आरोप : अमेरिकन फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने 24 जानेवारी रोजी अदानी समूहावर आपला अहवाल प्रसिद्ध केला. ज्यामध्ये फर्मने गटावर खात्यांमध्ये फसवणूक आणि शेअरच्या किमतीत हेराफेरीसारखे अनेक गंभीर आरोप केले होते. हे आरोप कंपनीने साफ फेटाळून लावले आहेत. मात्र या सर्व प्रकारानंतरही समूहाचे शेअर्स घसरू लागले. त्यामुळे गौतम अदानी यांची संपत्ती निम्म्याने घटली. यामुळेच अदानींनी त्यांच्या उद्योगांच्यावर विश्वास निर्माण व्हावा यासाठी उपाय करण्याची ही संधी एकप्रकारे साधली आहे.