भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये नुकताच लव्ह जिहादविरोधी कायदा मंजूर करण्यात आला आहे. अभिनेत्री कंगना रणौतने या कायद्याचे समर्थन केले असून, या कायद्यामुळे लव्ह जिहाद पीडित लोकांना न्याय मिळेल असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. कंगना आपला अगामी चित्रपट 'धाकड'च्या चित्रिकरणासाठी भोपाळमध्ये शुक्रवारी दाखल झाली यावेळी ती बोलत होती. दरम्यान तीने यावेळी पर्यटन मंत्री उषा ठाकूर यांची देखील भेट घेतली.
दरम्यान तिने यावेळी बोलताना महिला अत्याचारांच्या घटनांवर देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आरोपींना सैदी अरेबियाच्या धर्तीवर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कंगनाने केली आहे. भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये अनेक दोष आहेत, अनेकवेळा महिलांवर अत्याचार होतो, मात्र गुन्हाच सिद्ध होत नाही. त्यामुळे महिलांना प्रचंड मानसिक त्रास होतो, न्याय मिळण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहावी लागते, या सर्व त्रुटी दूर करून आरोपीला सौदी अरेबियाच्या धर्तीवर शिक्षा झाली पाहिजे असेही कंगनाने यावेळी म्हटले आहे.
चित्रपटासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म चांगला पर्याय
पुढे बोलताना कंगनाने म्हटले की चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म एक चांगला पर्याय आहे. आतापर्यंत अनेक चांगले चित्रपट या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. येणाऱ्या काळात ओटीटी हा एक चांगला पर्याय म्हणून समोर येऊ शकतो. दरम्यान कंगना तीच्या आगामी चित्रपट धाकडच्या चित्रिकरणासाठी भोपाळला पोहोचली आहे. या चित्रपटासाठी कंगना विशेष ट्रेनिंग देखील घेत असून, ती आता आपल्या चित्रपटाचे पुढील चित्रिकरण मध्य प्रदेशातील भोपाळ, पंचमढी आणि बैतूलमध्ये पूर्ण करणार आहे.