नई दिल्ली - हत्येप्रकरणी बांगलादेशात फाशी देण्यात आलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या 10 वर्षांपासून तो भारतात लपला होता. गुप्त माहितीवरून गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली आहे. मासूम असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक कट्टाही जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायदा आणि परदेशी कायद्यान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. नाव बदलून आरोपी येथे राहत होता.
अपहरण आणि निर्घृण हत्या
अतिरिक्त आयुक्त शिबेश सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2005मध्ये मासूमने त्याच्या चार साथीदारांसह झहीरुल इस्लामचे बांगलादेशातील मध्य नाल बुनिया बाजारातून अपहरण केले होते आणि दुसर्याच दिवशी निर्घृण हत्या केली. पोलिसांना संबंधित मृतदेह शेतात आढळला. या प्रकरणातील सर्व आरोपींना बांगलादेश पोलिसांनी अटक केली. खटल्यानंतर 2013मध्ये मासूमला अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा सुनावली होती, तर इतर चार आरोपींना निर्दोष मुक्त केले होते.
खानपूर येथून गुन्हे शाखेकडून अटक
शिक्षा होण्यापूर्वीच मासूमने जामिन घेतला आणि बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला. अलीकडेच गुन्हे शाखेच्या स्पेशल टास्क फोर्सला माहिती मिळाली, की बांगलादेशचा हा आरोपी दिल्लीत आहे. या माहितीवरून गुन्हे शाखेचे डीसीपी भीष्म सिंह यांच्या देखरेखीखाली एसीपी पंकज सिंह आणि निरीक्षक दिग्विजय सिंह यांच्या पथकाने खानपूरजवळून त्याला अटक केली. त्याच्याकडून एक बॅग आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. शस्त्रास्त्र कायद्याच्या परदेशी कायद्यान्वयेही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिकडच्या काळात अनेक बांगलादेशी गुन्हेगारांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरोडे इतर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये त्यामुळे घट झाल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.
10 वर्षांपासून भारतात लपला होता आरोपी
२०१०मध्ये सरबर या एजंटमार्फत आरोपी मासूम भारतात आला. त्याने बंगळुरुत आरोपीला थांबवले. काही काळानंतर सरबर बांगलादेशात गेला आणि भारतात परतला नाही. मासूम सध्या सरबरची पत्नी नजमाकडे सरबर म्हणून राहत होता. त्याच्या परिचयाच्या व्यक्तींना भेटण्यासाठी तो सीमापुरी आणि संगम विहार परिसरात आला असता पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, त्याच्या अटकेची माहिती बांगलादेश पोलिसांना दिली आहे.