नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. सिंग यांनी त्यांचे वकील मनिंदरजीत सिंग बेदी यांच्यामार्फत ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा आणि अबकारी घोटाळा प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी जोगिंदर यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यांनी ४८ तासांत माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही यामध्ये म्हटले आहे.
षडयंत्रात अडकवले जात आहे : दारू घोटाळ्यात त्यांचे नाव चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आल्याचे संजय सिंह यांच्या बाजूने सांगण्यात आले आहे. आपली बदनामी करण्याच्या षडयंत्राखाली आपले नाव टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या प्रकरणात एकही साक्षीदार आणि पुरावा नाही. या संदर्भात आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी १३ एप्रिल रोजी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन ईडीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच, दबावाखाली खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असे ते म्हणाले होते.
प्रसारमाध्यमांतून नाव प्रसारीत केले : अबकारी धोरण घोटाळ्यात त्यांचे नाव प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध केले गेले, असे संजय सिंग यांचे म्हणणे आहे. मीडियासमोर ईडीच्या आरोपपत्राची प्रत दाखवत संजय सिंह म्हणाले की, हे 6 जानेवारीचे आरोपपत्र आहे. यामध्ये दिनेश अरोरा नावाच्या व्यक्तीने सांगितले की, अमित अरोरा यांच्या मालकीचे दुकान मनीष सिसोदिया यांनी संजय सिंह यांच्या सूचनेवरून हस्तांतरित केले आहे. अशा सूचना मी कशाला देणार असेही संजय सिंह म्हणाले आहेत.
दारू घोटाळ्याशी काहीही संबंध नाही : संजय सिंह म्हणतात की, यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यातील संबंधांबाबत अनेक प्रकरणे उघड केली होती. त्यामुळे आता मला धमकावण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी, बदलाच्या भावनेने त्याची बदनामी करण्याचा कट ईडीने रचला आहे असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
48 तासांत माफी मागावी : ईडीला पाठवलेल्या मानहानीच्या नोटीसमध्ये त्यांच्या वकिलाने संजय सिंह यांचा दारू घोटाळ्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. तसेच, ते घाबरलेले नाहीत आणि सूडाच्या भावनेने केलेल्या या कारवाईबाबत त्यांचे म्हणणे ते नक्की मांडतील. त्यांच्या नावाचा ईडीमध्ये ज्या प्रकारे वापर करण्यात आला आहे त्याबाबत ईडी अधिकाऱ्यांनी 48 तासांत माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : PM Modi's Security breach: पंतप्रधानांच्या सुरक्षेत केरळ पोलिसांकडून चूक, गुप्तचर सुरक्षा योजना झाली लीक