रांची (झारखंड) Aaditya Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज (शुक्रवार, १७ नोव्हेंबर) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेतली. ते ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसतर्फे आयोजित 'थिंक २०२४' मध्ये सहभागी होण्यासाठी रांची येथे गेले होते. कॉंग्रेस नेते शशी थरूर देखील त्यांच्यासोबत होते.
केंद्र सरकारवर जोरदार टीका : झारखंडच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे यांनी देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर चर्चा केली. यानंतर त्यांनी शशी थरूर आणि सुवीर सरन याच्यासोबत 'थिंक २०२४' चर्चासत्रात हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. 'देशभरातील तरुणांची विचारसरणी वेगळी आहे. देशातील तरुणांना रोजगाराची, जीवन सुखकर कसं होईल याची चिंता आहे. मात्र आज केंद्र सरकार काय करत आहे? लोकांना आपापसात भांडायला लावण्याशिवाय ते काही काम करत नाहीत", असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आम्ही हिंदू आहोत : "पक्ष फोडणाऱ्या आमच्या पक्षाच्या गद्दार आमदारांनी आधी राजीनामे द्यायला हवे होते. मात्र ते मंत्री आणि मुख्यमंत्री झालेत", असं आदित्य ठाकरे म्हणाले. "जनतेचं प्रेम माझ्यावर आणि माझ्या पक्षावर आहे. त्यामुळेच ते नागरी निवडणुका घेत नाहीत", अशी टीका त्यांनी केली. आम्ही हिंदू आहोत पण बिल्किस बानोच्या दोषींना माफ करणाऱ्या हिंदुत्वाच्या बाजूनं नाही. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरात सर्वांचं योगदान आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ते बांधलं जातंय. मात्र केंद्र सरकारला याचं श्रेय घ्यायचंय. हे चुकीचे आहे", असं आदित्य ठाकरे म्हणाले.
केंद्राकडून फेडरल रचनेवर हल्ला : राज्यातील विद्यमान शिंदे सरकारच्या भवितव्याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, सभापतींनी न्यायाधिकरणाप्रमाणे काम करावं, त्यांनी राजकारण करू नये. "आज ज्या राज्यांमध्ये एनडीएची सरकारे नाहीत, त्या राज्यांमध्ये केंद्राकडून फेडरल रचनेवर हल्ला केला जातोय. आयटी, ईडी, सीबीआय आज निष्पक्ष नाहीत. भाजपा आणि एनडीए सत्यमेव जयते म्हणतात आणि आम्ही सत्यमेव जयतेची लढाई लढत आहोत", असं ते म्हणाले.
पाच राज्यांमध्ये कॉंग्रेस सत्तेत येणार : शुक्रवारी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभेसाठी मतदान झालं. काँग्रेस पाच राज्यांमध्ये सरकार स्थापन करणार असून भाजपाचा दारुण पराभव होणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. "देशातील जनतेला समजलं आहे की, 'इंडिया आघाडी' संविधानासाठी आणि २०२४ मध्ये देशात सुख, समृद्धी आणणारं सरकार स्थापन करण्यासाठी लढत आहे, असं त्यांनी नमूद केलं.
हेही वाचा :