लखनऊ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला आधीपेक्षा अधिक भीषणता पहायला मिळाली. पहिल्या लाटेमध्ये एका कुटुंबातील एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह होत होती. तर दुसऱ्या लाटेमध्ये पूर्णच्या पूर्ण कुटुंबेच पॉझिटिव्ह झालेली पहायला मिळाली. लखनऊमध्येही अशीच एक दुर्दैवी घटना घडली. कोरोनामुळे एका महिन्याच्या आतच एका कुटुंबातील आठ लोकांना आपले प्राण गमवावे लागले.
योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप..
या मृतांच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर चांगले उपचार न केल्याचा, आणि वेळेत ऑक्सिजनही उपलब्ध करुन दिला नसल्याचा आरोप केला आहे. कुटुंबप्रमुख ओंकार सिंह यादव हे आपली कर्मकहाणी सांगताना अगदीच भावूक झाले होते. त्यांनी सांगितले, की त्यांचे चार भाऊ, दोन बहिणी, आई आणि मोठी आई या सर्वांचा एका महिन्याच्या आतच मृत्यू झाला आहे.
त्यांच्या भावाला ताप आला होता. तेव्हा गावातच एका दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्याची प्रकृती अधिक बिघडल्यामुळे त्यांना बीकेटीच्या राम सागर मिश्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या दवाखान्यात ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असल्यामुळे त्यांनी त्याठिकाणी दाखल केले होते. मात्र, दाखल केल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. हे ऐकून त्यांच्या मोठ्या आईदेखील धक्क्याने कालवश झाल्या.
यानंतर रुग्णालयाची साडेसाती सुटलीच नाही..
यानंतर त्यांचा दुसरा भाऊही आजारी पडला. त्याला रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथेही डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या दुसऱ्या भावाचा मृत्यू झाल्याचे ओंकार सिंह यांनी म्हटले. या रुग्णालयातील डॉक्टर एका कागदामध्ये गुंडाळून औषध देत होते. तसेच, कोरोना चाचणीही बाहेरच करावी लागत होती. आपल्या भावाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असूनही त्याला कोरोना वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती अजून बिघडल्यामुळे त्याला लोहिया रुग्णालयात हलवण्यास सांगण्यात आले. मात्र, लोहिया रुग्णालयाने दाखल करुन घेण्यास नकार दिला. असे करत करत शेवटी इरम रुग्णालयात व्हेंटिलेटर असलेला बेड मिळाला. मात्र, त्यानंतरही आपल्या भावाला कोणी वाचवू शकले नाही, असे ओंकार यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांच्या आदेशांनंतरही रुग्णालय प्रशासन ढिम्म..
या सर्व प्रकाराची जेव्हा मीडियामध्ये चर्चा सुरू झाली, तेव्हा बीकेटीच्या एसडीएम त्याठिकाणी पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी गावच्य सर्व समस्या दोन तासांमध्ये सोडवण्याचे आदेश लेखापालला दिले. मात्र, या सरकारी अधिकाऱ्यांचे दोन तास अजूनही पूर्ण झाले नाहीत, असे ओंकार हतबलपणे म्हणाले.
गाव सोडलंय वाऱ्यावर..
ओंकार सिंह यादव म्हणाले, की आमच्या गावात आजपर्यंत ना सॅनिटायझेशन झाले आहे, ना कोरोना चाचणी शिबीर. यामुळेच गावातील सुमारे ५० लोकांचा कोरोना बळी गेला असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, गावात सध्या शेकडो लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : भारतातील कोरोना स्ट्रेन्सना मिळाली ओळख; 'काप्पा' आणि 'डेल्टा' अशी नावं