भूवनेश्वर - अतिवृष्टी झाल्याने महाराष्ट्र आणि गोव्याला मदत करण्यासाठी ओडिशामधील एनडीआरएफची आठ पथके महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. एका पथकामध्ये 25 जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. यातील चार पथके पुण्यात बचावकार्य करतील. दोन टिम रत्नागिरी जिल्ह्यात आणि दोन गोव्यात काम करतील. भारतीय वायुसेनेच्या विशेष उड्डानेद्वारे ही पथके महाराष्ट्र व गोवाकडे रवाना झाली होती.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहेत. भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. नदी-नाले ओसंडून वाहत असून अनेक भाग पाण्याखाली गेल्याने, परिस्थिती चिंताजनक आहे. जीवितहानी होऊ नये, यासाठी शासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. एनडीआरएफ, आर्मी, हवाई दलामार्फत बचावकार्यही सुरु आहे. दुसरीकडे महाड येथे दरड कोसळून सुमारे ३५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनेक कुटुंब दरडीखाली अडकले. त्यांना बाहेर काढण्याचेही काम युध्द पातळीवर सुरु आहे.
'एनडीआरएफ'च्या तुकड्या तैनात' -
एनडीआरएफच्या एकूण 14 तुकड्या नेमून दिलेल्या जिल्ह्यांत पोहचल्या आहेत. पालघर 1, ठाणे 2, रायगड 2, रत्नागिरी 4, सिंधुदुर्ग 1, सांगली 1, सातारा 1, कोल्हापूर 2, एसडीआरएफ'च्या नागपूरसाठी 2 आणि या रायगड जिल्ह्यासाठी 2 अशा 4 तुकड्या बचाव कार्य करीत आहेत. याशिवाय पोलादपूर करिता एनडीआरएफची 1 टीम मुंबई येथून हवाई मार्गे पाठविण्यात आली आहे. तटरक्षक दलाच्या 2, नौदलाच्या 2 तुकड्या रत्नागिरी येथे बचाव कार्य करीत आहेत. राखीव तुकड्या अंधेरी येथे - 2, नागपूर येथे 1, पुणे येथे 1, एसडीआरएफ धुळे येथे 1, आणि नागपूर येथे 1 अशा तैनात करण्यात आल्या आहेत. तर ओडिशामधून आलेल्या 8 तुकड्यातील 4 पुण्यात, 2 रत्नागिरी आणि 2 गोव्यात बचावकार्य करतील.
दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत -
राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. तसेच, जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासनामार्फत करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. तर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपये सानुग्रह मदत तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केली आहे.
हेही वाचा - राज्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, दुर्घनेतील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर