कोरापूट : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या ओडिशातील आदिवासींचाही गौरव करणे गरजेचे आहे. 1942 मध्ये महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरोधात भारत छोडो हा नारा दिला. याला प्रतिसाद देत ओडिशातील कोरापुट जिल्ह्यातील आदिवासींनी ब्रिटिशांविरोधातील लढा आणखी तीव्र केला. शहीद लक्ष्मण नायक यांच्या नेतृत्वातील मथिली पोलीस ठाण्यावरील हल्ला, गुनुपूरमधील आदिवासींचा विद्रोह आणि पपडहंडीतील थुरी नदी तीरावरील शेकडो आदिवासींचे हौतात्म्य यामुळे ब्रिटिशांविरोधात एक भक्कम संदेश समाजात गेला. 1942 मधील भारत छोडो आंदोलनातील कोरापुटचे योगदान हे अतिशय उल्लेखनीय आणि अतुलनीय होते असे सर्वोदयचे कार्यकर्ते कृष्णा सिंह म्हणाले.
अनेकांचे विस्मरण
शेकडो आदिवासींचे हौतात्म्य आणि प्रयत्नांनी भारताचा स्वातंत्र्य लढा यशस्वी झाला असला तरी यापैकी केवळ काही जणांनाच हौतात्म्याचा दर्जा बहाल करण्यात आला. जे तुरूंगात गेले किंवा ज्यांना फाशीची शिक्षा झाली केवळ अशा क्रांतीकारकांनाच हौतात्माचा दर्जा दिला गेला. सर्वांना शहीद लक्ष्मण नायक यांचे नाव माहिती आहे. मात्र इतरांचे नाव इतिहासाच्या पानांमध्ये विरून गेले आहे. सर्वांना शहीद लक्ष्मण नायक यांच्याविषयी माहिती आहे. मात्र मथिलीत ब्रिटिशांच्या गोळीबारात त्यांच्याशिवाय इतर कोण कोण मारले गेले याची माहिती मथिलीतील स्थानिकांनाही नाही. विस्मरणात गेलेल्या शहीदांविषयी हा एक अन्यायच आहे. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. अशा वेळी या हुतात्मांच्या कुटुंबीयांना ओळख मिळाली पाहिजे असे मत कोरापूटचे माजी जिल्हाधिकारी गंगाधर परिदा यांनी व्यक्त केले.
सरकारची अनास्था
दुर्दैवाने, लक्ष्मण नायक यांच्यासारख्या परिचित स्वातंत्र्य सैनिकांचेही सरकारकडून अतिशय दूर्मिळतेने स्मरण केले जाते. लक्ष्मण नायक यांच्या जयंती आणि पुण्यतिथीदिनी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र वर्षातील इतर दिवशी मात्र शहीदांचे गाव विस्मरणात जाते. शहीदांच्या कुटुंबियांविषयीची सरकारची अनास्थाही अतिशय दुर्दैवी आहे. अनेक हुतात्मांचे कुटुंबीय सरकार दरबारी दखल घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सर्व जण लक्ष्मण नायक यांच्याविषयी बोलतात, त्यांच्या कार्याचे कौतुक करतात. मात्र लक्ष्मण नायक यांच्या कुटुंबीयांसाठी काहीही करण्यात आले नाही. सरकार लक्ष देत नाही. आम्हाला साधे घरही देण्यात आले नाही अशी खंत शहीद लक्ष्मण नायक यांचे नातू मधू नायक यांनी बोलून दाखविली.
विकासकामे सुरू
तेन्तुलीगुम्मा आणि बायपरीगुडा ब्लॉकमधील इतर भागातील शहीदांच्या जमीनीचा विकास केला जात असल्याचे प्रशानाकडून सांगितले जात आहे. या विकास कामांची सुरूवात झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. शहीद लक्ष्मण नायक यांचे गाव असलेली तेन्तुलीगुम्मा ही आमच्यासाठी एक महत्वाची पंचायत आहे. गेल्या वर्षी इथे कोलाबवर मोठ्या पुलाच्या उभारणीला सुरूवात झाली. बायपरीगुडा ब्लॉकमधील ग्रामस्थांना सुविधा पुरविण्याचे आमचे ध्येय आहे असे कोरापूटचे जिल्हाधिकारी अब्दल अख्तर यांनी सांगितले.