नवी दिल्ली : केंद्रसरकारने आज 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये 'रॉकेटरी' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे तर 'एकदा काय झालं' या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. गोदावरी या मराठी चित्रपटानेही पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. या चित्रपटासाठी उत्कृष्ठ दिग्दर्शनाचा पुरस्कार निखील महाजन यांना जाहीर झाला आहे. सलील कुलकर्णी यांचा 'एकदा काय झालं' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून घोषित करण्यात आलं. पुष्पा चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लु अर्जुन याला जाहीर झाला. तसेच आलिया भट्ट यांना गंगूबाई काठियावाडी, तर क्रिती सेनन यांना मीमी चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
एकदा काय झालं चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्यानंतर दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांनी ईटीव्ही 'भारत'ला खास प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'मला असं वाटतं बाप आणि मुलगा यावर चित्रपट बनवल्यामुळं पालकांच्या जीवनावर याचा चांगला परिणाम होईल. तसंच या चित्रपटामुळे नाती जवळ येऊ लागतील.
मला वाटतं बाप आणि मुलाच्या नात्यावर एक चित्रपट बनवला. त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, हे जास्त महत्वाचं आहे. हा पुरस्कार मिळाल्याचा मला खूप आनंद झाला - डॉ. सलील कुलकर्णी (दिग्दर्शक)
मराठी चित्रपट बनवल्याचा आनंद : 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात गोदावरी चित्रपटानेही बाजी मारली आहे. निखील महाजन यांना गोदावरी चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये निखिल महाजन यांनी दिग्दर्शन केलेल्या 'गोदावरी' चित्रपटाला पुरस्कार मिळालेले आहेत. या चित्रपटात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, विक्रम गोखले, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट मानवी नातेसंबंधातील भावनांवर आधारीत आहे. गोदावरी नदीच्या काठावर राहणाऱ्या कुटुंबाची कथा निखिल महाजन आणि प्राजक्ता देशमुख यांनी लिहिली आहे. चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर दिग्दर्शक निखिल महाजन यांनी ईटीव्ही 'भारत'शी संवाद साधला.
"मी आताच नागपुरातून मुंबईत आलो. विमानतळावरुन घरी जाण्यासाठी कॅबची वाट बघत असतानाच राष्ट्रीय पुरस्काराची माहिती मिळाली. पुरस्कार जाहीर झाल्याचं समजताच आनंदाचा धक्काच बसला. त्यातून बाहेर येण्यास पाच मिनिटे लागली. या पुरस्कारामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. हा खूप मोठा पुरस्कार आहे. एवढी अपेक्षा मला नव्हती. मराठी चित्रपट उत्कृष्ट असतात, हे या पुरस्काराने सिद्ध झालं. त्यामुळे अधिक चांगला मराठी चित्रपट बनवल्याचा आनंद आहे."- निखील महाजन (दिग्दर्शक)
एकदा काय झालं सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा झाली. यामध्ये २०२१ सालात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय पुरस्कार मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकण्याची इच्छा प्रत्येक दिग्दर्शकाची असते. सलील कुलकर्णी दिग्दर्शित 'एकदा काय झालं' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्याने मराठी चित्रपट प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. या चित्रपटात सुमित राघवन, उर्मिला कोठारे, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, मुक्ता बर्वे, पुष्कर श्रोत्री यांसारख्या अनुभवी कलाकारांनी अभिनय केला आहे.
पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांची यादी :
सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा- सरदार उधम
सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा- एकदा काय झालं
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट – कलकोक्खो
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट – लास्ट फिल्म शो
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – ७७७ चार्ली
सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट – समांतर
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट – होम
नॉन-फीचर फिल्म चित्रपट :
- सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म – एक था गाव (गढवाली आणि हिंदी)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – बकुअल मतियानी, स्माइल प्लीज (हिंदी) चित्रपटासाठी
- कौटुंबिक मूल्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट – चांद सांसे (हिंदी)
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर – बिट्टू रावत, पाटल ती (भोटिया)
- सर्वोत्कृष्ट अन्वेषणात्मक चित्रपट – लुकिंग फॉर चालान (इंग्रजी)
- सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट – सिरपिगालिन सिपांगल (तमिळ)
- सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट – मिठू दी (इंग्रजी), थ्री टू वन (मराठी आणि हिंदी)
- सर्वोत्कृष्ट पर्यावरण चित्रपट – मुन्नम वालावू (मल्याळम)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स :
- सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- आरआरआर - तेलुगु
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- पुष्पा १
- सर्वोत्कृष्ट एडिटर- गंगूबाई काठियावाडी
- सर्वोत्कृष्ट संवाद लेखक- गंगूबाई काठियावाडी
- सर्वोत्कृष्ट गायिका- श्रेया घोषाल
सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री :
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट ( गंगूबाई काठियावाडी) आणि क्रिती सेनन (मीमी)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता- पुष्पा- अल्लू अर्जुन
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : पंकज त्रिपाठी
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - निखिल महाजन ( गोदावरी )
- सर्वोत्कृष्ट चित्रपट- 'रॉकेट्री : द नांबी इफेक्ट'
- सर्वोत्कृष्ट मिशिंग चित्रपट – बूमबा राइड
- सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट – अनुर
- सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म : रॉकेट्री
तांत्रिक पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट स्टंट : आरआरआर
- सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन : आरआरआर
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स : आरआरआर
- विशेष ज्युरी पुरस्कार : शेर शाह (दिग्दर्शक विष्णू वर्धन)
- सर्वोत्कृष्ट गीतकार - कोंडा पोलम (गीतकार चंद्र बोस)
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक: पुष्पा (देवी श्री प्रसाद)
- सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट: गंगुबाई काठियावाडी (प्रितशील सिंग डिसोझा)
- सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार : सरदार उधम (ई वीरकपूर )
- सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन : दिमित्री आणि मानसी
- सर्वोत्कृष्ट संपादन – गंगुबाई काठियावाडी (संजय लीला भन्साळी)
- सर्वोत्कृष्ट पटकथा : नायतू (मल्याळम) गंगूबाई काठियावाडी (हिंदी)
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : सरदार उधम
हेही वाचा - Alia Bhatt And Ramayana : आलिया भट्ट नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटामधून पडली बाहेर