दिसपुर : आसाम-नागालँड सीमेवरील धनसिरी भागात आसाम पोलीस आणि दिमसा नॅशनल लिबरेशन आर्मीच्या (डीएनएलए) या माओवादी संघटेनच्या काही संशयित सदस्यांमध्ये आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चकमक पार पडली. या चकमकीत सहा संशयित माओवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
करबी अँगलॉंग जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश सोनोवाल हे पोलीस दलाचे नेतृत्व करत होते. तसेच, यामध्ये आसाम रायफल्सचे एक पथकही पोलिसांसोबत होते. चकमकीनंतर या ठिकाणाहून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठाही जप्त केला आहे. यामध्ये चार एके-४७ रायफल्स, चार 'पॉईंट ३२' पिस्तुल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसांचा समावेश आहे.
१९ मे रोजी संजय रॉंगहांग नावाच्या एका व्यक्तीची अज्ञाताकडून गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर करबी अँगलॉंग पोलीस या आरोपीचा शोध घेत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक पुष्पराज सिंह यांच्या आदेशानुसार पोलिसांनी या परिसरात शोधमोहीम राबवली असता, सीमा भागात माओवादी असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानंतर आज पहाटे या परिसरात चकमक सुरू झाली होती.
हेही वाचा : ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारला पंजाब पोलिसांनी केली अटक; हत्येचा आहे आरोप