चंदीगढ - नवज्योत सिंग सिद्धू आज पंजाब प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. सिद्धूंच्या पदभार कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्याच्या बसचा अपघात झाला आहे. सरकारी प्रवासी बस आणि कार्यकर्त्यांच्या बसची धडक झाली. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून 15 पेक्षाअधिक जण जखमी आहेत. दोन्ही बसची धडक एवढी जोरदार होती, की दोन्ही बसच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला.
आतापर्यंत चार मृतदेह मथुरादास प्रशासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवज्योत सिंग सिद्धू आज चंदीगड येथील काँग्रेस भवनात पदभार स्विकारणार आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री सहभागी होतील. सिद्धूंच्या पदग्रहण समारंभाला उपस्थित राहून अमरिंदर सिंग यांनी दोघांमधील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे बोलेल जात आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये अनेक कारणांवरून दुफळी निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. पक्षातील अंतर्गत कलह मिटवण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना हस्तक्षेप करावा लागला होता. आगामी वर्षात पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून त्यादृष्ट्रीने पक्षातील अंतर्गत वाद मिटवणे गरजेचे आहे.
पंजाबमधील राजकीय समीकरण -
पंजाब विधानसभा निवडणूक 2017 साली पार पडली होती. यावेळी 117 जागांसाठी मतदान पार पडले. 11 मार्च 2017 रोजी मतगणना केली गेल्यावर काँग्रेस पक्षाला 77 जागा मिळाल्याचे निष्पन्न झाले. अकाली दल व भाजपा युतीला जोरदार पराभवाचा सामना करावा लागला. आम आदमी पार्टीला देखील अपेक्षित यश मिळाले नाही. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत अकाली दल व भाजपाची युती तुटली आहे. शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पक्ष सोबत लढणार आहेत. यामुळं पंजाबमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - नवज्योत सिंग सिद्धू यांनी घेतली काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधींची भेट