बीजापूर - छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये 22 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. या घटनेने देश हादरला. या चकमकीत 31 जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. यातील काही जवानांनी चकमकीबद्दल ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींना सांगितले.
एसटीएफ कॉन्स्टेबल देवप्रकाश यांनी सांगितले, की जवानांना सर्च ऑपरेशनदरम्यान टेकडीवर नक्षलवाद्यांनी घेरले. चोहीबाजूने गोळीबार होत होता. जवळपास 400 नक्षलवादी आमच्यावर गोळीबार करत होते. तेव्हा आम्हाला काहीच कळत नव्हते. मरण आले तर आले. मात्र, आता लढायच, असा विचार केला. आम्हीही त्यांच्यावर गोळीबार केला. यात काही नक्षलवादी ठार झाले असून अनेक जण जखमी झाले.
आपल्या सैनिकांना वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण गोळीबार इतका झाला की ते हुतात्मा सैनिकांचे मृतदेहही उचलू शकले नाहीत. भविष्यातही अशा नक्षलवाद्यांविरूद्ध लढत राहू, असे कॉन्स्टेबल देवप्रकाश म्हणाले.
कोब्रा बटालीयनमधील बलराज सिंग यांनीही चकमकीचा भयानक अनुभव सांगितला, ते म्हणाले, की नक्षलवाद्यांजवळ बॉम्ब होते. बॉम्बमुळेच जवान हुतात्मा झाले. नक्षलवाद्यांची 400 लोकांचा गट होता. त्यात काही स्थानीकही होते.
कशी झाली चकमक?
सुरक्षा दलाच्या 1 हजार 500 जवानांची एक तुकडी बीजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमाक्षेत्रात शोधमोहीम राबवत होती. तर दुसरीकडे नक्षलवाद्यांच्या बाजूने वांछित माओवादी कमांडर आणि 'पीपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मीच्या बटालियन नंबर एक'चा नेता हिडमा आणि त्याची सहकारी सुजाता यांच्या नेतृत्त्वाखाली सुमारे 400 नक्षलवादी एकत्र आले होते. यावेळी सुमारे 400 नक्षलवाद्यांनी दीड हजार जवानांच्या एका तुकडीला घेराव घालत त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. या चकमकीमध्ये 22 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. तर या चकमकीत 25 हून अधिक नक्षलवादीही ठार झाल्याची सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह यांनी दिली.
हेही वाचा - 'महाविकास आघाडीचे नाही, तर महावसुलीचे सरकार' रविशंकर प्रसाद यांची टीका