कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कॅबिनेटमधील चार मंत्र्यांनी महत्त्वाच्या कॅबिनेट बैठकीला दांडी मारली. हे मंत्री राजीनामा देणार असल्याची चर्चा आता रंगली आहे. नुकतेच तृणमूल काँग्रेसचे महत्त्वाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे आणखी नेते बाहेर पडणार का? अशी चर्चा सुरू आहे.
उघडपणे व्यक्त केली नाराजी -
राजीब बॅनर्जी, रबिंद्रनाथ घोष, गौतम देब आणि चंद्रनाथ सिन्हा अशी या चार मंत्र्यांची नावे आहेत. बैठकीला गैरहजर राहिलेल्या चार मंत्र्यांपैकी तिघांनी योग्य कारण दिलं असून वनमंत्री राजीब बॅनर्जी यांनी मौन बाळगलं असल्याची माहिती मिळत आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांबद्दल राजीब याआधी उघडपणे नाराजी दर्शवली होती.
विधानसभा निवडणुकांच्या तोडांवर राजकीय हालचाली
पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. वरिष्ठ भाजप नेत्यांनी मागील काही दिवसांत बगाल दौरा केला आहे. ममता बॅनर्जी यांच्या हातून सत्ता खेचून घेण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. त्यामुळे येत्या काळात बंगालमध्ये राजकीय घडामोडी वेगाने घडणार असल्याची चाहूल लागत आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप २०० पेक्षा जास्त जागा जिंकत सत्ता स्थापन करेल, असा दावा भाजपा नेते आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील मदीनापूर येथे त्यांनी सभा घेतली होती. यावेळी त्यांनी ममता सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. भाजपा तृणमूल काँग्रेस पक्षाला फोडत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्याचा समाचारही शाह यांनी घेतला होता. जेव्हा ममता यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता. तेव्हा त्यांनी काय केले, असा प्रश्न त्यांनी या निमित्ताने ममता यांना केला.