गांधीनगर : गुजरातच्या तापी जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळी एक भीषण अपघात झाला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, सात जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. लग्नाच्या वऱ्हाडींना घेऊन परतत असताना खासगी बसने उभ्या असणाऱ्या ट्रकला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.
व्यारा-बाजीपुरा राष्ट्रीय महामार्गावर झाला अपघात..
तापीमधील वालोद गावाजवळ व्यारा-बाजीपुरा राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. या बसमध्ये महाराष्ट्राच्या मालेगावमधील रहिवासी प्रवास करत होते. ते सूरतला झालेल्या एका लग्नसमारंभावरुन परतत होते, अशी माहिती वालोद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही. आर. वासवा यांनी दिली.
तिघे जागीच ठार, तर सात जखमी..
या अपघातात नईम हाजी रशीद मणियार (५१), अझहर अजीझ मणियार (२२) आणि नूर मोहम्मद फकीर मोहम्मद (४५) या तिघांचा मृत्यू झाला. हे तिघेही नाशिकच्या मालेगावचे रहिवासी होते. या तिघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला, तर सात प्रवासी गंभीर जखमी झाले अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा : तामिळनाडू सरकारने १२ हजार कोटींचे शेतकरी कर्ज केले माफ; मुख्यमंत्र्यांची घोषणा