भाटापारा - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मात्र येथील प्रचारसंभाना रंग चढत असताना राजकारणाला हिंसक वळण प्राप्त झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भाटापारामधील भाजपचे खासदार अर्जून सिंह यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. हे बॉम्ब हल्ले बुधवारी सायंकाळच्या सुमारास झाले आहेत.
अर्जून सिंह यांच्या घराजवळ हे बॉम्ब हल्ले झाल्याची माहिती वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे. पोलीस आणि दंगा नियंत्रण पथकाकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या प्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही भाजप खासदार सिंह यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी तपास करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवरून हिंसक राजकारणाला सुरुवात झाल्याचे चित्र या घटनेवरून समोर येत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. अर्जून सिंह हे बैरकपूरचे खासदार आहेत. त्यांच्या घराच्या परिसरात जवळपास १२ ठिकाणी बॉम्बहल्ले करण्यात आले आहेत. या प्रकरणी हा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी आज पश्चिमबंगालमध्ये-
पश्चिम बंगालमधील पुरुलियामध्ये पंतप्रधान मोदींची प्रचारसभा पार पडणार आहे. याबाबत बोलताना मोदी म्हणाले, की संपूर्ण बंगालच्या जनतेला आता बदल हवा आहे. भाजपाचे सुशासन पश्चिम बंगालमध्ये आणण्याचा बंगालमधील लोकांचा निर्धार आहे.