नवी दिल्ली - आज मोबाईल प्रत्येकाच्याच आयुष्यातील जीव की प्राण अशी वस्तू झाली आहे. मोबईलमुळे संवाद सोपा झाला. भारतात पहिल्यांदा मोबाईलवरून दोन व्यक्तींमध्ये संवाद झाला, तो म्हणजे आजच्याच दिवशी 26 वर्षांपूर्वी. कोलकातामधील रॉयटर इमारतीमधून थेट नवी दिल्लीतील संचार भवनामध्ये 31 जुलै 1995 साली पहिला फोन कॉल करण्यात आला होता. भारतातील दूरसंचार आणि कम्यूनिकेशन क्षेत्राला कलाटणी देणारा तो पहिला फोन कॉल होता. आज भारत जगातील दुसऱ्या क्रमांकावरील टेलिकॉम मार्केट आहे.
तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम आणि तत्कालीन पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बासू यांच्यादरम्यान 31 जुलै 1995 रोजी फोन कॉलद्वारे भारतातील पहिले-वहिले मोबाइल संभाषण झाले. ज्योती बासू यांनी कोलकातामधील राइटर्स इमारतीमधून थेट नवी दिल्लीतील संचार भवनमध्ये मोदी टेलस्ट्राच्या (Modi Telstra) मोबाइल नेट सर्व्हिसच्या माध्यमातून हा फोन कॉल करण्यात आला होता. मोबाइल नेट सर्व्हिसची सेवा त्याकाळी कोलकातामध्ये सुरू झाली होती.
मोदी टेलस्ट्रा हे भारतातील मोदी ग्रृप आणि ऑस्ट्रेलियामधील टेलस्ट्रा या मोठ्या टेलिकॉम कंपनीमधील जाईंट व्हेंचर होते. ही कंपनी भारतामध्ये मोबाइल सेवा पुरवण्यासाठी परवाना देण्यात आलेल्या 8 कंपन्यांपैकी एक होती. 4 मेट्रोपोलियन शहरांमध्ये प्रत्येकी 2 परवाने देण्यात आले होते.
देशात मोबाईल टेक्नोलॉजीवर 1980 मध्ये काम सुरू झाले होते. बीके मोदी यांनी मोदी कॉर्प नावाची एक कंपनी स्थापन केली. ही कंपनी दूरसंचार, वित्त, मनोरंजन आणि तंत्रज्ञानाशी संबंधित काम करत होती. 1993 मध्ये मोदी कॉर्प ऑस्ट्रेलियामधील टेलस्ट्रा कंपनीशी भागीदारी केली. 1994 मध्ये तत्कालीन पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बासू यांनी मोबाईल नेटवर्क क्रांतींचे देशातील पहिले शहर कोलकाता व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. बसूची इच्छा पूर्ण करण्यासठी मोदी यांनी भागिदार कंपनी टेलस्ट्राकडे मदत मागण्यासाठी ऑस्ट्रेलिया गाठलं. तेव्हा बीके मोदींची नोकिया कंपनीसोबत चर्चा झाली आणि त्यांनी नोकिया टेक्नोलॉजी भारताला देण्यासाठी तयारी दर्शवली.
प्रति मिनिट 24 ते 25 रुपये खर्च यायचा -
नोकिया ही त्यावेळची दूरसंचार तंत्रज्ञानातील आघाडीची कंपनी होती. नोकिया आणि टेलस्ट्रा यांनी मिळून कोलकातामध्ये मोबाईल नेटवर्कचे काम एका वर्षात पूर्ण केले. 31 जुलै 1995 रोजी या नेटवर्कद्वारे पहिला कॉल करण्यात आला. मात्र, मोबाईल सेवेला देशातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागला. याचे कारण महागडे कॉल दर होते. सुरुवातीला, आउटगोइंग कॉलसाठी 16.80 रुपये प्रति मिनिट आणि कॉल ऐकण्यासाठी 8.40 रुपये प्रति मिनिट किंवा एकूण कॉलसाठी एकूण 24 ते 25 रुपये प्रति मिनिट लागायचे.