बंगळुरू - देशात कोरोनाचा कहर आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येण्याची चिन्ह दिसत आहे. त्यातच तिसऱ्या लाटेची जोरदार चर्चा रंगली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुलांना होईल असा तर्क बांधला जात आहे. महाराष्ट्राशेजारील कर्नाटकमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याचे संकेत मिळू लागले आहेत. कर्नाटकात गेल्या 5 दिवसांत (6 ते 10 ऑगस्ट) तब्बल 242 लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.
बीबीएमपीने (ब्रुहत बंगळुरू महानगर पालिका) 19 वर्षांखालील 242 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती जारी केली. आकडेवारीनुसार, 9 वर्षापेक्षा कमी वय असलेले 106 आणि 9 ते 19 वर्षादरम्यानच्या 136 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 123 मुली आणइ 119 मुले आहेत. येत्या काही दिवसांत पॉझिटिव्ह रुग्ण वाढू शकतात, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.
येत्या काही दिवसात ही संख्या तिप्पट होईल. आपल्या मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्यांना घरामध्ये ठेवावे आणि कोरोना नियमांचे पालन करावे, असे आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. कर्नाटकात कोरोनासंदर्भात खबरदारी बाळगत आधीच सर्व जिल्ह्यांमध्ये नाईट आणि विकेंड संचारबंदीची आहे. तसेच केरळ-कर्नाटक आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर निर्बंध कडक करण्यात आले आहेत. केवळ आरटी-पीसीआर सर्टिफिकेट असलेल्या प्रवाशांनाच राज्यात प्रवेश दिला जात आहे. तर राज्यात दिवसाला 1 हजार 500 नवे रुग्ण आढळत आहेत.
कोरोनाची आकडेवारी -
कर्नाटकात सध्या 22,877 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 28,63,117 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 3,688 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोब देशपातळीवर सध्या 3,87,987 रुग्ण सक्रिय आहेत. तर एकूण 4,29,669 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे 16 जानेवरीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत 52,36,71,019 जणांचे आतापर्यंत लसीकरण झाले आहे.
हेही वाचा - पालकांनो लक्ष द्या! लहान मुलांसाठी आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी
हेही वाचा - VIDEO : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी किती घातक? जाणून घेऊया तज्ज्ञांकडून
हेही वाचा - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना कसं सुरक्षित ठेवायचं?