कोलकाता - पाकिस्तानी लष्कराने काल (शुक्रवार) भारतीय लष्करी चौक्या आणि नागरी भागांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात भारतीय लष्कराच्या चार जवानांना वीरमरण आले. तर स्थानिक नागरीकही ठार झाले. या गोळीबारात पश्चिम बंगाल राज्यातील सुबोध घोष हा २४ वर्षीय जवान शहीद झाला आहे. सुबोध चार वर्षांपूर्वी सीमा सुरक्षा दलात भरती झाला होता. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीयांवर आणि गावावर शोककळा पसरली.
डिसेंबरमध्ये गावी येण्याआधीच दुखद घटना
सुबोध घोष हा पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील तेहत्ता या गावचा रहिवासी होता. जम्मू काश्मीरमधील उरी येथे कर्तव्य बजावत असताना त्याला वीरमरण आले. त्याच्यामागे आई, वडील, पत्नी आणि अवघे तीन महिन्यांचे मूल आहे. डिसेंबर महिन्यात तो गावी सुट्टीवर येणार होता. काल पाकिस्तानी लष्कराने भारतीय चौक्यांना लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला. भारतानेही पाकिस्तानच्या या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. यात पाकिस्तानचे सुमारे १० ते १२ जवान आणि नागरिक ठार झाले.
पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्रातील नागपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवानही शहीद झाले आहेत. कोल्हापूरातल्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या गावचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आले आहे. तर नागपूरमधील काटोल येथील भूषण सतई या जवानाला वीरमरण आले आहे.