बगहा : सापाचे नाव ऐकताच अनेक लोक घाबरतात. त्यातच एखाद्याच्या घरात एक-दोन नव्हे तर 24 कोब्रा साप आढळल्यास त्याची काय अवस्था होईल याची कल्पना करा. होय, असेच एक प्रकरण बिहारच्या बगहा येथून समोर आले आहे. येथे एका घरात तब्बल 24 कोब्रा साप आणि सापाची सुमारे 60 अंडी सापडली आहेत!
घरातील जिन्याखाली सापांनी तळ ठोकला होता : बिहारच्या बगाह येथील रहिवासी मदन चौधरी यांच्या घरातील जिन्याखाली सापांनी तळ ठोकला होता. या ठिकाणी कोब्रासमवेत सापांची सुमारे 50 ते 60 अंडी सापडली आहेत. घराच्या जिन्याखाली एक ड्रेसिंग टेबल होता. या टेबलाखाली सापांनी आपला अड्डा बनवला होता. जेव्हा घरातील मुले जिन्याजवळ खेळत होती तेव्हा त्यांची नजर एका कोब्रावर पडली. त्याला पाहताच सर्वांचीच पाचावर धारण बसली. त्यानंतर मुलांनी आरडाओरड करून घरात साप असल्याची माहिती लोकांना दिली. चांगली गोष्ट म्हणजे हा साप कोणालाही चावला नाही.
सर्पमित्राने केली सर्व सापांची सुटका : घरात साप असल्याची बातमी परिसरात आगीसारखी पसरली. त्यानंतर ताबडतोब सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. जेव्हा सर्पमित्राने सापाला बाहेर काढायला सुरुवात केली तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले. कारण तेथे जवळपास दोन डझन साप आणि त्यांची 50 ते 60 अंडी होती. सर्पमित्राने सर्व सापांची सुटका केली आहे.
लहान मुलांच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले आणि ही बातमी गावात झपाट्याने पसरली. त्यानंतर स्थानिक लोक तिथे पोहोचले आणि सापाला बाहेर काढू लागले. त्यावेळी साप पटकन ड्रेसिंग टेबलच्या खाली घुसला. ड्रेसिंग टेबलला बाजूला केल्यानंतर तेथे तीन ते चार कोब्रा साप दिसले. त्यानंतर आम्ही सर्पमित्राला बोलावले. - घरमालक
सापांना गंडक नदीच्या किनारी सोडले : ही घटना शुक्रवारी सायंकाळची आहे. रात्री उशिरापर्यंत सापांची सुटका करण्यात आली. घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात साप पाहून घरातील लोक तसेच शेजारी घाबरले होते. भीतीमुळे घरातील सदस्य घरात झोपले नाहीत. सर्पमित्राने या सर्व सापांना आणि त्यांच्या अंड्यांना सुरक्षितपणे गंडक नदीच्या किनारी सोडले आहे.
हेही वाचा :