गुवाहटी - आसामच्या विविध जिल्ह्यांतून रोजंदारी मजुरीसाठी गेलेले १९ बांधकाम मजूर अरुणाचल प्रदेशात ( Arunachal Pradesh ) बेपत्ता झाले ( Construction Labours Missing ) आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व अरुणाचलच्या दुर्गम भागातील कामासाठी गेलेला कामगारांचा एक गट ईदमध्ये सहभागी होण्यासाठी कामाच्या ठिकाणाहून निघाला होता. मात्र, त्यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा नाही. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील कुरुंग कुर्मे जिल्ह्यातील कुरुग नदीमध्ये एकाचा मृतदेह आढळला आहे.
बेपत्ता झालेले मजूर हे आसामच्या दुर्गम भागातील आहेत. ते दीर्घ काळापासून एका कंत्राटदाराकडे काम करत होते. अब्दुल अमीन, वाजेद अली (बोंगाईगाव), नुरुल इस्लाम (अभोयापुरी), शामजुल शाह, कोल पुदीन, ऐनुल हक, फरीजुल हक, मनोवर अली, माजिदुल अली (धुबरी), जोयनाल अली, रुस्तम अली, हिकमत अली (अभयपुरी), मोइजुल हक, खैरुल इस्लाम, शाहिदुल इस्लाम, अमिदुल हक, इब्राहिल अली (बारपेटा) अशी बेपत्ता मजुरांची नावे आहेत.
याआधी मणिपूर रेल्वे प्रकल्पाच्या घटनेत अनेक मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर दुर्गम भागातील कामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षेबद्दल मजुरांमध्ये प्रचंड नाराजी होती. परंतु अशा आपत्तींची कारणे शोधण्यासाठी शासनाकडून कोणताही पुढाकार घेण्यात आलेला नाही. अरुणाचल प्रदेशातून १९ मजूर बेपत्ता झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असली तरी, या घटनेशी संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणताही औपचारिक संवाद साधला गेला नाही.