धनबाद (झारखंड) : झारखंडच्या धनबादमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील एका शाळेत एक मुलगी टिकली लावून आल्याने शिक्षिकेने तिच्यावर आक्षेप घेत तिला थोबाडीत मारली. शिक्षिकेच्या या वागण्याने दुखावलेल्या या दहावीच्या विद्यार्थिनीने चक्क आत्महत्याच केली. त्यानंतर संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी मृत विद्यार्थ्यीनीचा मृतदेह घेऊन शाळेत गोंधळ घातला. ग्रामस्थांनी शाळेसमोर धरणे धरले आणि रास्ता रोको केला. आता या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी मुलीचे नातेवाईक करत आहेत.
मुलीने सोमवारी सकाळी आत्महत्या केली : धनबाद जिल्ह्यातील तेतुलमारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट झेवियर्स शाळेत दहावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. ही मुलगी तेतुलमारी पोलीस ठाण्याच्या हनुमानगढी कॉलनीतील रहिवासी होती. तिने सोमवारी सकाळी आत्महत्या केली. ग्रामस्थांनी सांगितले की, सोमवारी मुलगी टिकली लावून शाळेत गेली होती. शाळेतल्या शिक्षिका सिंधु यांनी शाळेच्या आवारात टिकली लावून येण्यास आक्षेप घेतला. त्यावरून शिक्षिकेने मुलीला थोबाडीत मारली. शिक्षिकेच्या या वागण्याने दुखावलेल्या या विद्यार्थ्यीनीने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली.
नातेवाईकांची शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी : विद्यार्थिनीने तेतुलमारी पोलिसांच्या नावे सुसाईड नोट लिहून तिच्या गणवेशात ठेवली होती. या घटनेनंतर विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी मंगळवारी मृतदेह घेऊन शाळेसमोर धरणे धरले. त्यामुळे तेतुलमारी ते नया मोर हा रस्ता पूर्णपणे ठप्प झाला होता. विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी शाळेतील शिक्षकावर कारवाई करत नुकसान भरपाई करण्याची मागणी केली आहे.
मुख्याध्यापक आणि शिक्षिकेविरुद्ध एफआयआर दाखल : या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाने दोषी शिक्षकावर कडक कारवाई करावी, असे स्थानिक बौरी समाजाच्या जिल्हाध्यक्षांनी मागणी केली आहे. याशिवाय दोषी शिक्षकाला अटक करण्याची मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे. सध्या पोलिसांनी सेंट झेवियर्स शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षिकेविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
हे ही वाचा :