लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बांदा शहरात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय बलात्कार पीडितेने, आरोपीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. आपल्या राहत्या घरी, गळफास लाऊन घेत तिने आत्महत्या केली.
दहा वर्षांपूर्वी झाला होता बलात्कार..
मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीवर १० वर्षांपूर्वी बलात्कार झाला होता. यानंतर आरोपीला सात वर्षांची शिक्षा झाली होती. त्यानंतर तो या गावात परत आला होता. या व्यक्तीने परत येताच त्या मुलीला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली होती. या मुलीचे लग्न ठरु न देण्याचाही तो प्रयत्न करत होता. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली, असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे.
अधिक तपास सुरू..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीने बुधवारी आत्महत्या केली. यानंतर शवविच्छेदन प्रक्रिया पार पडल्यानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. तिच्या घरची परिस्थिती हलाखीची असून, तिचे वडील अपंग असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दिनेश कुमार यांनी दिली.
हेही वाचा : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करुन जिवंत जाळले; बिहारमधील धक्कादायक घटना