नवी दिल्ली : पूर्व दिग्गज कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या डेमोक्रॅटिक आझाद पक्षातील १७ ज्येष्ठ नेत्यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (17 leaders of Ghulam Nabi Azad party). उल्लेखनीय म्हणजे, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा २० जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल होण्याच्या काही दिवस आधी या नेत्यांनी हे पाऊल उचलले आहे. 50 वर्षे कॉंग्रेस पक्षात घालवल्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काँग्रेस सोडलेल्या आझाद यांनी पक्षातील विविध समस्यांसाठी राहुल यांच्या कार्यशैलीला जबाबदार धरले होते. (17 former leaders join congress).
आयुष्यातील सर्वात मोठी चूक : या नेत्यांच्या प्रवेशावर कॉंग्रेसचे संघटना सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले, 'आम्ही त्यांचे स्वागत करतो. ही त्यांची घरवापसी आहे. ही फक्त सुरुवात आहे. भारताच्या एकात्मतेवर विश्वास ठेवणारे आणखी लोक भारत जोडो यात्रेत सामील होतील'. माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी आमदार बलवंत सिंग आणि माजी पीसीसी प्रमुख पीरजादा मोहम्मद सय्यद या नेत्यांनी आझाद यांच्या पक्षात सामील होणे ही 'आयुष्यातील सर्वात मोठी चूक' असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी कबूल केले की काश्मीर मधील लोकांचे गांधी कुटुंबाशी विशेष नाते आहे.
मी सोनिया गांधींचा आभारी : तारा चंद म्हणाले, 'आम्ही काँग्रेसमध्ये ५० वर्षे काम केले. आम्हाला पक्षाकडून खूप काही मिळाले. काँग्रेसने माझ्यासारख्या गरीब गावकऱ्याला प्रोत्साहन दिले. सोनिया गांधींनी मला जम्मू-काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष आणि नंतर उपमुख्यमंत्री केले. डीएपीमध्ये सामील होणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. मी भावनिक झालो आणि चुकीचे पाऊल उचलले. मी हे एखाद्याच्या मैत्रीसाठी केले. मला काँग्रेसमध्ये परत येऊ दिल्याबद्दल मी सोनिया गांधींचा आभारी आहे.' तारा चंद म्हणाले की त्यांना आणि इतर अनेकांना आझाद यांनी अचानक काँग्रेसमधून राजीनामा दिल्याची बातमी ऐकायला मिळाली. त्यांना काय चालले आहे याची कल्पना नव्हती. ते म्हणाले, 'मला त्यांच्या शीर्ष नेतृत्वातील समस्या आणि त्यांनी पक्ष का सोडला हे माहीत नाही. आझाद हे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते आणि त्यांना प्रदीर्घ अनुभव होता. एक मित्र आणि नेता म्हणून माझे त्यांच्याशी 40 वर्षांचे संबंध होते'.
काश्मीरमध्ये दहशतवाद कमी झाला नाही : पीरजादा यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, 'लोकांचे गांधी कुटुंबावर प्रेम आहे. मी काश्मीर आणि काँग्रेस पक्ष सोडल्याबद्दल माफी मागतो'. माजी JKPCC प्रमुखांच्या मते, गेल्या काही वर्षांत काश्मीरात दहशतवाद कमी झाला नाही तर प्रत्यक्षात परिस्थिती आणखीच बिघडली आहे. पीरजादा म्हणाले, 'केंद्रशासित प्रदेशात दहशतवाद कमी झालेला नाही तर तो वाढला आहे. या परिस्थितीत धर्मनिरपेक्ष शक्तींना बळकटी देणे अत्यंत आवश्यक आहे आणि काँग्रेसच हे काम करू शकते'.
फारुख अब्दुल्ला यात्रेत सहभागी होणार : या प्रकरणावर वेणुगोपाल यांनी नमूद केले की, हे नेते प्रत्यक्षात रजेवर होते आणि आता परत 'जॉइन' होत आहेत. जम्मू-काश्मीरच्या प्रभारी रजनी पाटील म्हणाल्या, काँग्रेस हा त्यांचाच पक्ष आहे हे त्यांना कळून चुकले आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये वातावरण बदलले आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला या यात्रेला उपस्थित राहणार आहेत. त्यांचा मुलगा ओमर अब्दुल्ला श्रीनगरमध्ये राहुल यांचे स्वागत करतील. अवामी लीगचे नेतेही या यात्रेत सामील होतील. आझाद यांच्या काँग्रेसमध्ये जाण्याच्या शक्यतेवर वेणुगोपाल म्हणाले की, त्यांनी स्वतः अशा वृत्तांचे खंडन केले आहे. भारताच्या एकात्मतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे या यात्रेत स्वागत आहे. यातील बहुतेक नेते डीएपीचे संस्थापक सदस्य होते, परंतु राहुलच्या यात्रेचे जाहीरपणे कौतुक केल्यामुळे आझाद यांनी त्यांची हकालपट्टी केली होती.
श्रीनगरमध्ये यात्रेची समाप्ती : भारत जोडो यात्रा 20 जानेवारीला जम्मू-काश्मीर मध्ये प्रवेश करेल. हा टप्पा काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे कारण राहुल 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये भारताचा ध्वज फडकावून देशव्यापी पदयात्रा संपवतील. याच दिवशी महात्मा गांधींचा हुतात्मा आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर रोजी यात्रा सुरू करण्यापूर्वी राहुल यांनी ५ सप्टेंबर रोजी अहमदाबाद येथील साबरमती आश्रमात महात्मा गांधींचे आशीर्वाद घेतले होते.