इंदूर : पोटदुखीने त्रस्त असलेल्या एका महिलेच्या पोटातून डॉक्टरांनी तब्बल 15 किलोची गाठ काढल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या महिलेला गेल्या अनेक दिवसापासून पोटदुखीचा त्रास होत होता. या महिलेवर इंदूरमधील इंडेक्स रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. ही महिला आष्टा येथील रहिवाशी आहे. डॉ अतुल व्यास, डॉ गौरव सक्सेना, डॉ गौरव यादव, डॉ आशिष शर्मा, डॉ मीनल झाला यांच्या पथकाने 2 तास शस्त्रक्रिया करुन या महिलेला जीवदान दिले.
महिलेच्या शरीरात गाठ फुटण्याची होती शक्यता : या पीडित महिलेचे वजन 49 किलो असून तिच्या शरीरात 15 किलोची गाठ होती. त्यामुळे या महिलेचे पोट फुगले होते. पोटात गाठ असल्याने या महिलेला चालण्यासह बसण्याचाही त्रास होत होता. ही गाठ काढली नसती तर ती शरीरात फुटण्याची शक्यता बळावली होती, अशी माहिती शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर अतुल व्यास यांनी दिली.
महिलेला मिळाले जीवदान : या पीडित महिलेवर शहरातील अनेक रुग्णालयात उपचार केले, मात्र त्यामुळे कोणताही फरक पडला नसल्याची माहिती पीडित महिलेच्या मुलीने दिली. इंडेक्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी पोटात गाठ असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. ही गाठ लवकर काढली नसती, तर ती फुटण्याची शक्यता होती. त्यामुळे पीडित महिलेला आपला जीव गमवावा लागला असता. मात्र इंडेक्स रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळीच शस्त्रक्रिया केल्यामुळे या महिलेला जीवदान मिळाले आहे. सध्या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर आहे. इंडेक्स हॉस्पिटलमुळे आईला नवीन जीवन मिळाल्याचेही यावेळी पीडितेच्या मुलींनी सांगितले.
थोडीशी चूक रुग्णाच्या बेतली असती जीवावर : पीडित 41 वर्षीय महिला ही मूळची आष्टा येथील असून गेल्या काही दिवसांपासून ती पोटदुखीची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे जात होती. प्राथमिक तपासणीनंतर महिलेच्या पोटात गर्भाशयाची मोठी गाठ असल्याचे डॉक्टरांना आढळून आले. तिची गाठ खूप मोठी असल्याने तिला अन्न खाण्याशिवाय चालायला त्रास होत होता. या गाठीला अंडाशयातील गाठ म्हणून ओळखले जाते. यानंतर उपचाराची तयारी सुरू झाली आणि महिलेच्या पोटातून ही गाठ यशस्वीरीत्या काढण्यात आल्याची माहिती डॉक्टर अतुल व्यास यांनी दिली. ही गाठ काढणे खूप अवघड होती. महिलेच्यात पोटात 15 किलोची गाठ होती आणि थोडीशी चूक शरीरातील अनेक नसा खराब करू शकल्या असत्या. त्यामुळे ऑपरेशनला 2 तास लागल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या डॉक्टरांनी घेतला शस्त्रक्रियेत सहभाग : या शस्त्रक्रिया पथकात डॉ. विधी देसाई, डॉ. यश भारद्वाज, डॉ. राज केसरवानी, डॉ. होशियार सिकरवार, डॉ. राहुल शर्मा, डॉ. आनंद कुशवाह, डॉ. प्रियांका ठाकूर, डॉ. रुची तिवारी, डॉ. अपूर्वा सक्सेना, अॅनेस्थेसिया टीममध्ये वैभव तिवारी आदींनी या शस्त्रक्रियेत सहभाग घेतला होता. इंडेक्स ग्रुपचे चेअरमन सुरेश सिंग भदौरिया आणि व्हाईस चेअरमन मयंकराज सिंग भदौरिया, डायरेक्टर आर एस राणावत, अतिरिक्त डायरेक्टर आर सी यादव आणि मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. जी एस पटेल यांनी या गुंतागुंतीच्या ऑपरेशनसाठी डॉक्टरांच्या टीमचे अभिनंदन केले आहे.