बंगळुरू - 25 नोव्हेंबरपासून आतापर्यंत ब्रिटनहून भारतात परतलेल्या 10 प्रवाशांची कोविडची तपासणी केली असून ते पॉझिटिव्ह सापडले आहेत, अशी माहिती कर्नाटकचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री के. सुधाकर यांनी शुक्रवारी दिली.
'माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार, 10 जण कोविड चाचणीत पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यांचे सर्व नमुने निमहंस (NIMHANS) येथे पाठवले गेले आहेत. त्यांचा अनुवांशिक क्रम लावण्यासाठी दोन ते तीन दिवसांची आवश्यकता आहे. एकदा तो अहवाल आल्यावर कळेल की, तो दुसऱ्या प्रकारचा कोरोना आहे की नाही. त्यानुसार आम्ही उपचारासाठी आवश्यक त्या प्रक्रियेचा अवलंब करू,' असे त्यांनी पत्रकार बैठकीतील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
त्यांच्या मते, या दुसऱ्या प्रकारच्या कोविडशी संबंधित तपशीलांवर अजूनही चर्चा होत आहेत आणि सुरुवातीच्या अभ्यासांनुसार दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या या विषाणूचा आणखी एक प्रकारचा कोरोना यूकेमध्ये सापडलेल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक गंभीर आहे.
'या 10 पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल आल्यानंतरच आम्ही कारवाई करू शकतो. ते आम्हाला मिळताच आवश्यक ती पावले उचलू. मी लोकांना सरकारवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही शंभर वेळा विचार करतो. लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे ही आमची महत्त्वाची बाब आहे,' असे ते म्हणाले.
हेही वाचा - कमल हसन यांना धक्का; मक्कल निधी मय्यम पक्षाचे सरचिटणीस अरुणाचलम भाजपमध्ये दाखल
सुधाकर यांनी नुकतेच सांगितले होते की, 25 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत सुमारे 2 हजार 500 लोक ब्रिटनहून एअर इंडिया आणि ब्रिटीश एअरवेजच्या विमानांनी राज्यात आले आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची स्थिती पाहण्यासाठी शासन चाचण्या करण्याच्या प्रयत्नात आहेत.
सरकारविरुद्ध होत असलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, हे असे सरकार आहे ज्यांच्या काळात रुग्ण बरे होण्याचा दर 97.5 टक्के आहे आणि मृत्युदर 1.22 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे.
'नवीन प्रकारचा कोरोना सापडल्यानंतर ब्रिटन आणि जर्मनीसारख्या देशांनी लॉकडाऊन लागू करणे आणि नंतर कर्फ्यू लागू करणे यासारख्या कठोर उपाययोजना अवलंबल्या आहेत. हे काय सूचित करते,' असे त्यांनी विचारले.
जनतेचे हित लक्षात घेऊन आणि त्यांच्या दैनंदिन कामांना अडथळा होणार नाही, अशा प्रकारे रात्री 11 नंतर कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे सुधाकर म्हणाले.
'यावर्षी जवळपास सर्व सण आपण थोडक्यात आणि घरच्या घरी साजरे केले आहेत. तेव्हा जरी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मौज-मजा करण्यास तरुण इच्छुक असले तरी, या रात्रीच्या कर्फ्यूविरुद्ध ओरड का केली जात आहे? ,' असे म्हणत त्यांनी काही कमी-जास्त घडल्यास विरोधक जबाबदार राहतील, असे विरोधी पक्षांना बजावले.
यूकेमध्ये कोविड-19चा नवीन प्रकार पसरल्याच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आठ दिवसांचा नाईट कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली होती. परंतु, गुरुवारी कर्फ्यू लागू होण्याच्या काही तास आधीच तो मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याच्या निर्णयावर स्पष्टपणे आक्षेप घेतला. तर, विरोधकांनी विषाणूचा प्रसार रोखण्यात याची कितपत होईल याविषयी संशय व्यक्त केला. कारण, कर्फ्यूची वेळ रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत होती.
हेही वाचा - उत्तरप्रदेश : हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर मुस्लीम व्यक्तीला धमकीचे फोन