मराठा युवकांचं धाराशिवमधील आंदोलन स्थगित, इमारतीवरून उडी मारण्याचा दिला होता इशारा - Maratha Agitation
Published : Jun 12, 2024, 6:27 PM IST
|Updated : Jun 12, 2024, 8:48 PM IST
धाराशिव Maratha Agitation : पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांची तब्येत बिघडत चालली असून मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कार्यालयावरून उड्या मारण्याचा इशारा मराठा आंदोलनकर्त्यांनी दिला होता.
अखेर आंदोलन मागे : धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालायावर चढून आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांनी आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं आहे. अंतरवालीवरून मनोज जरांगे पाटील आणि पांडुरंग तारक यांनी आंदोलकांशी फोनवर संवाद साधून आंदोलन मागे घेण्यास सांगितल्यामुळे हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं असल्याचं आंदोलक अमोल जाधव यांनी सांगितलं. सगेसोयरेचा आदेश आणि राज्यातील तीन हजार पेक्षा जास्त मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी आज दुपारी 12 वाजल्यापासून सकल मराठा समाजातील आंदोलक जिल्हाधिकारी कार्यलायावर चढून आंदोलन करत होते. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयावरून उड्या मारण्याचा इशारा दिला होता. आज पाच वाजता मनोज जरांगे पाटील यांनी उद्या अंतरवलीत राज्य सरकारचं शिष्टमंडळ येणारं असल्याचं सांगितलं. त्यामुळे आपण आंदोलन मागे घेत असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं.
या आंदोलनात अमोल जाधव, अक्षय नाईकवाडी, अभिजित सूर्यवंशी, तेजस बोबडे, प्रकाश पाटील, मनोज जाधव आदींनी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयावर दुपारी १२ वाजता चढून प्रचंड घोषणाबाजी करून परिसरातील वातावरण तणावपूर्ण करून सोडले होते. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, नायब तहसिलदार पांडे यांनी आंदोलकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.