साताऱ्यातील उमेदवारीचा तिढा सुटणार; शरद पवार गटातील दोन इच्छुक नेते एकाच हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना - Satara Lok Sabha Constituency
Published : Mar 6, 2024, 8:09 PM IST
सातारा Satara Lok Sabha Constituency : इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि संघटनांची आज (6 मार्च) सकाळी साताऱ्यातील कॉंग्रेस कमिटीत बैठक झाली. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. काही वेळ बैठकीत सहभागी होऊन खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील आणि सत्यजितसिंह पाटणकर हे शरद पवार गटाच्या मुंबईतील बैठकीसाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले. यापैकी श्रीनिवास पाटील आणि सत्यजितसिंह पाटणकर उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मुंबईतील बैठकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा सुटणार असून उमेवाराच्या नावाची निश्चिती देखील होणार आहे. मविआतील प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्याच पक्षातील उमेदवाराला उमेदवारी मिळणार अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने ते तयारीलासुद्धा लागलेले आहेत.