साईसच्चरित्र ग्रंथाचे इंग्लिशमध्ये ऑडिओ बुक, गायक सोनू निगमची पत्नी मधुरिमा निगमची साईसेवा - Madhurima Nigam
Published : Mar 3, 2024, 8:59 PM IST
शिर्डी (अहमदनगर) Saisacharitra Granth Audio Book : सुप्रसिद्ध गायक सोनू निगमची पत्नी मधुरिमा निगम यांनी श्री साईसच्चरित्र ग्रंथाचे इंग्लिश मधील ऑडिओ बुक बनवले आहे. हे ऑडिओ बुक त्यांनी युट्युब तसेच स्पॉअिफायच्या माध्यमातून सर्व साईभक्तांना विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. याच प्रमाणे आता बंगाली भाषेत देखील हे ऑडिओ बुक बनवणार असल्याचं मधुरिमा यांनी शिर्डीत सांगितलं.
साईबाबांच्या अनुभुतीचे प्रसंगही सांगितले : मधुरिमा निगम यांनी आज (3 मार्च) शिर्डीत साईदरबारी हजेरी लावली. यानंतर त्यांनी येथील हॉटेल टेम्पल ट्री येथे पत्रकारांशी संवाद साधला. जगभरात साईबाबांचे असंख्य भक्त आहेत. अनेक भाविक साईबाबांचा प्रचार प्रसार करण्यासाठी साईसेवा देत असतात. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या पत्नी मधुरिमा निगम यांनी साईभक्तांसाठी साईबाबांच्या जीवनावरील श्री साई सच्चरित्र ग्रंथाचे इंग्लिश मधील ऑडिओ बुक बनविलेले आहे. इंग्रजी भाषिक साईभक्तांना त्याचा लाभ होणार असून यातून साईबाबांच्या प्रचार-प्रसार होण्यासाठी मदतच होणार आहे. मधुरिमा यांनी त्यांना आजवर आलेल्या साईबाबांच्या अनुभुतीचे अनेक प्रसंगही यावेळी सांगितले.