"या भूमंडळी हैसा राजा पुन्हा होणे नाही"; शेतकरी चित्रकारानं भाकरीवर रेखाटली शिवरायांची हुबेहूब प्रतिमा, पाहा व्हिडिओ - SHIVAJI MAHARAJ IMAGE
Published : Feb 19, 2025, 5:24 PM IST
ठाणे : मुरबाडच्या एका शेतकरी चित्रकारानं ताटात भाकरी ठेवून त्या भाकरीवर शिवप्रतिमा काढत शिवरायांना अनोख्या पद्धतीनं वंदन केलं. सचिन पोतदार असं या शेतकरी चित्रकाराचं नाव आहे. तर "या भूमंडळी हैसा राजा पुन्हा होणे नाही" असं ब्रीदवाक्य त्यांनी भाकरीवर लिहिलं. सचिन पोतदार हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात कुटुंबासह राहात असून ते शेतीचा व्यवसाय करतात. चित्रकलेचा छंद त्यांनी लहानपणापासून जोपासला आहे. पहिल्यांदा शिवजयंती निमित्त ही अनोखी कलाकृती सादर केल्याचं सचिन पोतदार यांनी सांगितलं.
शिवरायांमुळेच आम्हाला शेतीतून भाकरी मिळाली : "छत्रपती शिवरायांमुळेच आम्हाला शेतीतून भाकरी मिळाली, अशी त्यामागे भावना असल्याचं सचिन पोतदार यांनी सांगितलं. सचिन यांनी काढलेलं चित्र आज ठाणे जिल्ह्यात आकर्षणाचा विषय ठरला आहे. अत्यंत सुंदर असं शिवरायांचं चित्र सर्वांनाच भावतंय. अनेकजण सचिन यांचं कौतुक करत आहेत.