पुणे शहरात महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींची बैठक, चर्चेत काय ठरलयं? - MAHAVIKAS AGHADI MEETING
Published : Oct 20, 2024, 7:19 AM IST
पुणे : येत्या एक-दोन दिवसात सर्वच पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर होणार आहे. सध्या काही जागांवरून महाविकास आघाडीत तिढा आहे. उमेदवार जाहीर होण्याआधीच पुण्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. जो उमेदवार पक्षाकडून दिला जाईल, त्याचं काम एकदिलानं करुन उमेदवार विजयी करणार असल्याचा यावेळी निर्धार करण्यात आला. माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, "20 ऑक्टोबरला दुपारी महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगानं पुणे शहरात महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढत असताना प्रचारयंत्रणा तसंच प्रचाराची रणनीती कशा पद्धतीनं असेल यावर चर्चा करण्यात आली."