संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठात बिबट्या; परिसरात खळबळ - LEOPARD IN UNIVERSITY
Published : Dec 24, 2024, 10:24 PM IST
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्याचं पिल्लू आल्याने परिसरात खळबळ उडाली. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या बचाव पथकानं शर्थीचे प्रयत्न करून त्यास पिंजऱ्यात कैद केलं.
परिसरात कायम बिबट्याचं वास्तव्य : दोन्ही बाजूनं डोंगर आणि जंगल असल्यानं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात अनेक वर्षांपासून बिबिट्यांचं वास्तव्य आहे. विद्यापीठ कर्मचाऱ्यांना नेहेमीच बिबट्याचं दर्शन घडतं. मंगळवारी दुपारी युजीसी गेस्ट हाऊस लगतच्या भिंतीजवळ बिबट्याचं पिल्लू दडून बसलं आल्याचं सुरक्षा रक्षकाला दिसलं. याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती देताच विद्यापीठ प्रशासनाच्यावतीनं याबाबत वन विभागाच्या बचाव पथकाला माहिती देण्यात आली. यावेळी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अमोल गावनेर यांचं पथक आणि डॉ. सावन देशमुख, डॉ. जयंत वडतकर आदींनी बिबट्याला मोठ्या शिताफीनं पिंजऱ्यात कैद केलं. यानंतर बिबट्याला वडाळी वन परिक्षेत्र परिसरात सोडण्यात आलं.