पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील कर्मचाऱ्यांचं निलंबन करा, अभाविपचा विद्यापीठावर मोर्चा - राम सीता अपमान प्रकरण
Published : Feb 4, 2024, 9:20 PM IST
पुणे Ram Sita Insulting Case : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी अलिकडेच राम, लक्ष्मण आणि सीता यांचा अपमान करणारं कथित नाट्य सादर केलं. त्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली आहे. जोपर्यंत ललित कला केंद्रातील कर्मचाऱ्यांचं निलंबन होणार नाही तोपर्यंत आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आज (4 फेब्रुवारी) मोर्चा काढून दिलेला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं आज चतुर्श्रुंगी मंदिरापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आणि हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी मोर्चात जोरदार घोषणाबाजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. सगळ्यांवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन विद्यापीठानं दिलं असलं तरी संबंधित कर्मचाऱ्यांचं निलंबन विद्यापीठानं का केलं नाही? ते लवकरात लवकर करावं यासाठी हा मोर्चा काढत असल्याचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महानगरप्रमुख अनिल ठोंबरे यांनी सांगितलं.