गुढीपाडवा उत्सव 2024 : साई बाबांच्या मंदिरावर 'श्रद्धेची गुढी', भाविकांची तोबा गर्दी - Gudi Padwa 2024 - GUDI PADWA 2024
Published : Apr 9, 2024, 12:05 PM IST
शिर्डी Gudi Padwa Festival In Shirdi 2024 : मराठी नववर्षाची सुरुवात आज ठिकठिकाणी गुढी-तोरणं उभारुन केली जातेय. शिर्डीच्या साईबाबा मंदिराच्या कलशावर आज गुढी उभारण्यात आली. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते साई मंदिरावर गुढी आणि पंचागाची विधीवत पूजा करत श्रद्धेची गुढी उभारण्यात आलीय. आज सकाळीच साडे सहा वाजता साईबाबा मंदिराच्या कळसाची साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक विधीवत पूजा केली. साई मंदीरातील सर्व धार्मिक पूजा विधी पंचांगाप्रमाणे चालतात. यावेळी नवीन पंचागाची विधीवत पूजा साई मंदिराचे पुजारी उपेंद्र पाठक, दिगंबर कुलकर्णी यांनी पौरोहित्य केलं. आज साईबाबांना सोन्याच्या अलंकारासह साखरेच्या गाठींचा खास श्रृंगार करण्यात आला होता.
मराठी नववर्षाच्या निम्मीतानं शिर्डी पंचक्रोशीतील तसेच देशभरातून मोठया प्रमाणात साईभक्त शिर्डीत दाखल झाले. भाविक साई बाबांच्या समाधीचं दर्शन घेत आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी कडु निंबाच्या पाणाला विशेष महत्व आहे. निंब हा कडू असला तरी तो आरोग्यास हितकारक असतो. साई बाबांनीही आपल्या जीवनात अनेक कडू घटना पचवत जनमानवाला संदेश दिला. आज साईंचं दर्शन घेत अनेक नवीन संकल्प या मराठी नववर्षाच्या निमीत्तानं साईभक्त करतात. गुढीपाडवा असल्यानं आज सायंकाळी साईबाबांची सुवर्ण रथात शिर्डीतून मिरवणूक काढण्यात येणार आहे. रथयात्रा मंदिरात आल्यानंतर उत्सवाची सांगता होईल. यावेळी श्री साईबाबा संस्थनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी ज्योती हुलवळे, प्रशासकिय अधिकारी विठ्ठलराव बर्गे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आणि संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.