नागपूरात शिवजयंती उत्साहात साजरी, ढोल ताशा पथकाकडून मानवंदना - SHIVJAYANTI CELEBRATION IN NAGPUR
Published : Feb 19, 2025, 12:01 PM IST
नागपूर- संपूर्ण राज्याप्रमाणचं उपराजधानी नागपुरातदेखील शिवजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यासाठी शिवभक्तांची रिघ लागली होती. यावेळी ढोल-ताशा पथकांकडून महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यात आली. अनेक वर्षांपासून महाल परिसरात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानातर्फे शिवजयंती निमित्य विविध कार्यक्रम साजरे केले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांनी या परिसरात नृत्य करत पोवाडा गायले. शिवराजांच्या घोषणांना परिसर दुमदुमून गेला. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक केल्यानंतर शिव आरती गाण्यात अली. त्यानंतर शिवस्तुती ललकारी करण्यात आली. दिवसभर शहरातील शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमुळे नागपुरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे.