उजनीवर स्थलांतरित फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन, अन्य पक्ष्यांचीही मांदियाळी - FLAMINGOS AT UJANI
Published : Jan 4, 2025, 9:14 PM IST
पुणे - सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर साकारलेल्या सोलापूर जिल्ह्याला वरदायिनी, तर देशोदेशीच्या स्थलांतरित पक्ष्यांची 'पंढरी' ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विदेशी पाहुणे पक्ष्यांच्या आगमनाला प्रारंभ झाला आहे. दरवर्षीप्रमाणे थंडीच्या मोसमात आशिया, उत्तर सैबेरिया, केनिया ऑस्ट्रेलियामधून फ्लेमिंगो म्हणजेच रोहित पक्षांचं उजनीच्या पाणलोट क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर आगमन झालं आहे. सध्या विणीचा हंगाम असल्यानं हे पक्षी काठावर घरटी करून पिलांना जन्म देतात. या पक्षांचे थवे पाहण्यास सोबतच त्यांच्या जल क्रीडा पाहण्यासाठी आणि त्यांची विहंगम छायाचित्रं काढण्यासाठी पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकार यांच्या कॅमेऱ्यांच्या नजरा उजनी जलाशयाकडे वळल्या आहेत. दरवर्षी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात धरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांचा मोठा वावर पाहायला मिळतो. यावर्षी उशिरा का होईना धरण परिसरात काही दिवसांपासून स्थानिक पक्ष्यांबरोबर हंगामी पक्षीही येऊन दाखल झाले आहेत.