केंद्र सरकारचा अर्थसंकल्प विकासाला गती देणारा - अजित मंगरूळकर
Published : Feb 1, 2024, 4:29 PM IST
|Updated : Feb 1, 2024, 5:04 PM IST
मुंबई : केंद्र सरकारनं सादर केलेला अर्थसंकल्प हा अतिशय समतोल साधणारा आणि विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधांवर अधिकाधिक भर देण्यात आला आहे. "कोणत्याही देशाचा विकास व्हायचा असेल तर पायाभूत सुविधा या अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि त्या दृष्टीनं या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व आहे. कोणतीही लोकप्रिय घोषणा अथवा निवडणुकीसाठी सादर केलेला अर्थसंकल्प असं या अर्थसंकल्पाला म्हणता येणार नाही. कारण अतिशय सकारात्मक आणि समतोल असलेला हा अर्थसंकल्प आहे, असं मंगरूळकर म्हणाले. ४० हजार जुन्या डब्यांचे आधुनिकीकरण करून त्यांना वंदे भारत मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तसंच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण मंत्रालयाला दिलेलं बजेट अथवा केलेली तरतूद अत्यंत महत्त्वाची आहे. या अर्थसंकल्पात सर्व बाबींवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. आरोग्य शिक्षण महिला विकास आणि शेतीमध्ये योग्य प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प पाहता जुलैमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये अधिक विकासाच्या दृष्टीने विचार होईल असा दावा मंगरुळकर यांनी केला आहे.