'श्रीराम रंगी रंगले' उत्सवात श्रीरामाची १०० फूट भव्य रांगोळी - Ram Mandir
Published : Jan 21, 2024, 9:46 PM IST
पुणे 100 Feet Rangoli : विश्व हिंदू परिषद आणि संस्कार भारती पुणे यांनी 'श्रीराम रंगी रंगले' उत्सवाचे संयोजन केले होते. अयोध्या येथे होत असलेल्या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद साजरा करण्यासाठी हा उत्सव पुण्यात साजरा केला जात आहे. संस्कार भारती आणि श्रीरंग कलादर्पणच्या कलाकारांनी प्रभू श्रीरामाची रांगोळी ७ हजार चौरस फूट आकारात साकारली आहे. यामध्ये रामायणातील ७ प्रसंग रेखाटण्यात आले आहेत. तसेच १४ भाषांमध्ये ४२ वेळा विविध पद्धतीने जय श्रीराम असे रेखाटण्यात आले आहे.
२५ चित्रांचे प्रदर्शन : आर्ट इंडिया फाऊंडेशनतर्फे 'खुला आसमान' श्री रामायणावर आधारित १२५ चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातून काढलेल्या २ हजार चित्रांमधील १२५ सर्वोत्कृष्ट चित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचातर्फे प्राचीन ७०० शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवसीय उत्सवात येणाऱ्या प्रत्येक रामभक्ताला श्रीराम खिचडी प्रसादाचे वाटप केटरिंग असोसिएशनच्या वतीनं करण्यात आलं आहे. उत्सवामध्ये प्रवेश विनामूल्य असून रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय.