सिंगापूरPM Narendra Modi :पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी गुरुवारी सेमीकंडक्टर युनिटला भेट दिली. सिंगापूरमधील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील महत्त्वाच्या उद्योगातील सहकार्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केलीय. वाँग यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत. सिंगापूर छोटं असूनही सेमीकंडक्टर उद्योगासाठी सुप्रसिद्ध आहे. दोन्ही मित्र देशांमधील व्यापार संधींच्या दृष्टीनं सेमीकंडक्टर उद्योगाला पंतप्रधान मोदींची भेट देणं महत्त्वाचं मानलं जातंय.
सेमीकंडक्टर क्षेत्रात संधी :सेमीकंडक्टर उद्योगानं भारतात विकासासह सहकार्यात अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. कारण सिंगापूर विद्यापीठांनं सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी एक अभ्यासक्रम विकसित केलाय. सेमीकंडक्टर औद्योगिक पार्क्स, ज्याला सिंगापूरमध्ये वेफर फॅब पार्क देखील म्हणतात. यातून दोन्ही देशामधील ज्ञानात वृद्धी होणार आहे. उत्पादनाच्या घटकांच्या बाबतीत सिंगापूरला जमीन तसंच कामरांच्या मर्यादा आहेत. मुबलक जमीन तसंच कुशल कामगार असलेला भारत सिंगापूरच्या उत्पादनात महत्वाचा भाग होऊ शकतो. सिंगापूरमधील सेमीकंडक्टर कंपन्यांना त्यांचा भारतात विस्तार करण्यासाठी प्रोत्साहित केलं जाऊ शकतं. सिंगापूरमध्ये सेमीकंडक्टर उपकरणे आणि साहित्य उत्पादक देखील आहेत. भारतातील सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमच्या विकासासाठी, अशा कंपन्यांचं सहकार्य उपयुक्त ठरू शकतं.
यावेळी पीएम मोदी म्हणाले,"माझे मित्र, पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्याशी चर्चा आजही सुरूच आहे. कौशल्य, तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, एआय आणि इतर अनेक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर आमची चर्चा झाली. व्यापाराला चालना देण्यासाठी त्यांनी सहमती दर्शवलीय."