नवी दिल्ली : भारतातील आयफोन उत्पादन Apple कंपनीनं निर्यात विक्रम प्रस्थापित केलाय. त्यांच्या उत्पादनामुळं Apple येत्या एक ते दोन वर्षांत 5-6 लाख रोजगार (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) निर्माण करण्याचा अंदाज आहे. उद्योगातील सूत्रांच्या मते, सरकारच्या उत्पादन-लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेमुळं आयफोनची निर्यात दर महिन्याला सुमारे $1 अब्जपर्यंत पोहोचत आहे. कंपनी पुरवठा साखळीत सुमारे 2 लाख लोकांना रोजगार देते. ज्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. यामध्ये विक्रेते आणि घटक पुरवठादार देखील समाविष्ट आहेत.
ॲपलच्या इकोसिस्टममध्ये 2 लाखांहून अधिक रोजगार :ॲपलसाठी दोन प्लांट चालवणारी टाटा इलेक्ट्रॉनिक्स, फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉनसह ॲपल इकोसिस्टममध्ये सर्वात मोठी रोजगार निर्मिती करणारी कंपनी आहे. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्यानं गेल्या 10 वर्षात मोबाईल उत्पादन हे रोजगार निर्मितीत आघाडीवर आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, एकट्या ॲपलच्या इकोसिस्टममध्ये 2 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे.
भारतात गुंतवणूक दुप्पट करणं : देशातील आयफोन कंपनी फेस्टिव्हल सीझन दरम्यान 10 हजारांहून अधिक लोकांना थेट नोकरी देणार आहे. Apple भारतात गुंतवणूक दुप्पट करत आहे. आयफोन कॅमेरा मॉड्यूल्ससाठी उप-घटक एकत्र करण्यासाठी टाटा समूहाची टायटन कंपनी आणि मुरुगप्पा समूहाशी बोलणी करत आहे. ऍपलनं भारतात दरवर्षी 50 दशलक्षाहून अधिक आयफोन बनविण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. कारण त्यांनी त्यांची काही उत्पादन चीनच्या बाहेर हलवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. भारतातून आयफोन निर्यात 2022-23 मधील $6.27 अब्ज वरून 2023-24 मध्ये $12.1 अब्ज होण्याच अंदाज आहे.