वॉशिंग्टन : गुगलनं गुरुवारी सर्च लॅबद्वारे एक नवीन प्रायोगिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वैशिष्ट्य लॉंच केलं. आस्क फॉर मी असं या फीचरचं नाव आहे. हे वैशिष्ट्य गुगल सर्चमध्ये उपलब्ध आहे. हे वैशिष्ट्य सध्या अमेरिकेतील निवडक वापरकर्त्यांसाठी गुगल सर्च ॲपच्या अँड्रॉइड आणि आयओएस आवृत्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या वैशिष्ट्याचा वापर करण्यासाठी वापरकर्त्यांना गुगलच्या सर्च लॅबमध्ये साइन अप करावं लागेल. त्यानंचर फीचर सक्रिय करावे लागेल. सध्या गुगलच्या सर्च लॅब्सचा भाग म्हणून उपलब्ध असलेले हे प्रायोगिक फीचर वापरकर्त्यांना फोन नंबर डायल न करता किंमत आणि उपलब्धता यासारखी आवश्यक माहिती ऍक्सेस करण्याची परवानगी देतंय.
सर्च लॅब वैशिष्ट्याची घोषणा
याबाबत एक्सवर (ट्विटर) एका पोस्टमध्ये, गुगलच्या उत्पादन व्यवस्थापनाचं उपाध्यक्ष रोझ याओ यांनी नवीन सर्च लॅब वैशिष्ट्याची घोषणा केली. नवीन एआय-संचालित वैशिष्ट्य गुगल सर्चमध्ये उपलब्ध असेल. विशिष्ट प्रश्नांसाठी व्यवसायांना कॉल करण्यासाठी तुम्ही एआयला सूचित करू शकता, असं त्यांनी लिहलं आहे. एकदा सक्रिय झाल्यानंतर, हे वैशिष्ट्य गुगल सर्चमध्ये स्वयंचलितपणे सुरू होईल. सध्या, ते फक्त नेल सलून आणि ऑटो रिपेअर शॉप्सना समर्थन देतंय.