मुंबई Electric Vehicle Charging Precautions : छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरात बुधवारी पहाटे एका इमारतीला आग लागल्यानं यात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. इमारतीबाहेर उभी असलेली ई-वाहन चार्जिंगला लावलेलं होते. याचं चार्जर दुकानाच्या आत होतं. याच चार्जरचा स्फोट होऊन आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळं ई-वाहनं आणि आगीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
वाहन हाताळण्याच्या प्रशिक्षणाची गरज : दिवसेंदिवस वाढणारे इंधनाचे भाव यामुळं नागरिकांचा कल आजघडीला ई-वाहनांकडे जास्त वळलाय. दिवसेंदिवस ई-वाहनांच्या विक्रीत वाढ होत असली त्याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती झालेली नसल्याचं दिसून येतंय. सरकार ई-वाहनांनी प्रोत्साहन देत असलं तरी ती वाहनं हाताळावी कशी, याबाबातचं प्रशिक्षण वाहनचालकांना मिळत नाही. या वाहनांचा वेग मर्यादित असल्यानं अनेकजण दुचाकींमध्ये बेकायदेशीर बदल करुन त्या वाहनाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या प्रमाणावर अशा घटना समोर आल्यानंतर 2022 मध्ये राज्यभरात असे बेकायदा बदल करणारे उत्पादक आणि वितरकांची तपासणी मोहिम राबविण्यात आली होती. यावेळी अनेक बेकायदेशीर बदल केलेली ई-वाहनं जप्त करण्यात आली होती.
लिथियम आयन अत्यंत ज्वलनशील-इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरी बाबत बोलताना योगटेक कंपनीचे संचालक चिन्मय गोरे म्हणाले की, "इलेक्ट्रिक बॅटरी चार्ज करताना खूप काळजी घ्यावी लागते. बॅटरी चार्ज करताना ती योग्य मानांकन असलेली सरकार मान्यता प्राप्त आहे का याची सर्वात आधी खात्री करून घ्यावी. एएसआय 156 अंतर्गत ती बॅटरी मान्यता प्राप्त असणे गरजेचे आहे. कोणत्याही बॅटरीच्या चार्जिंग करिता दुसऱ्या बॅटरीचा चार्जर वापरू नये. ज्या कंपनीची बॅटरी आहे त्याच कंपनीचा चार्जर असणे सर्वात महत्त्वाचे आहे. बॅटरीसाठी वापरण्यात आलेला लिथियम आयन हा अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलनशील असा धातू आहे. हा धातू अत्यंत उष्णता ग्राह्य असल्यामुळे तो उघड्यावर राहत नाही. तो योग्यरीत्या सांभाळला गेला पाहिजे, अन्यथा अपघाताच्या घटना घडू शकतात" असे गोरे म्हणाले.