महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणेकरांची सावली गुरुवारी 16 मे रोजी दुपारी 12-35 वाजता होणार गायब - ZERO SHADOW DAY 2024 - ZERO SHADOW DAY 2024

Zero Shadow Day 2024 : सूर्य स्थानिक अक्षांशावर ज्या दिवशी येतो त्यादिवशी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानं सावली अदृश्य होते, असं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यानी सांगितलं. तसंच ठाणे, डोंबिवली, कल्याण, बोरिवली भिवंडीकराना गुरुवार 16 मे रोजी दुपारी 12-35 वाजता शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे.

Zero Shadow Day
शून्य सावली दिवस (MH DESK)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 10:37 PM IST

ठाणे Zero Shadow Day 2024 : आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही असं म्हटलं जात असलं तरी, ते शंभर टक्के सत्य असतंच असं नाही. वर्षातील असे दोन दिवस असतात की, ज्या दिवशी भर दुपारी काही क्षण आपली सावलीही आपली साथ सोडून देते. या दिवसांना ‘शून्य सावली दिवस‘ असं म्हटलं जातं. आज आपण या शून्य सावलीचं रहस्य जाणून घेणार आहोत.

ठराविक दिवशीच शून्य सावलीचा अनुभव : शून्य सावलीचा हा अनुभव उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातूनच घेता येऊ शकतो. निरभ्र आकाशात सूर्य असताना मोकळ्या जागेवर उन्हात आपण उभे राहिलो तर जमिनीवर आपली सावली पडलेली दिसते. सूर्योदयाच्यावेळी सूर्य पूर्व क्षितिजावर असताना आपली सावली जास्त लांबीची पडलेली दिसते. जसजसा सूर्य वर येऊ लागतो, तसतशी आपल्या सावलीची लांबी कमी कमी होऊ लागते. नंतर सूर्य जसजसा पश्चिम क्षितिजाकडं जाऊ लागतो, तसतशी आपल्या सावलीची लांबी पुन्हा वाढत जाताना दिसते. वर्षातील दोन दिवस वगळता भर दुपारीही सूर्य आकाशात नेमका आपल्या डोक्यावर न आल्यानं भर दुपारीही आपली थोडीतरी सावली दिसतच असते. वर्षातील दोन दिवशी आपल्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती एक होते. त्या दिवशी भर दुपारी सूर्य आकाशात बरोबर आपल्या डोक्यावर आपली सावली नेमकी आपल्या पायाशी आल्यामुळं आपणास ती दिसू शकत नाही. त्यामुळं या ठराविक दिवशीच आपणास शून्य सावलीचा अनुभव घेता येतो.

शाळेमध्ये शिकलेला भूगोल :शून्य सावलीचं रहस्य समजून घेताना आपणास लहानपणी प्राथमिक शाळेमध्ये शिकलेला भूगोल परत आठवावा लागेल. पाच प्रमुख वृत्ते आहेत. (१) आर्क्टिकवृत्त - ज्याच्या पलिकडील उत्तरेकडील भागातून मध्यरात्रीचा सूर्य दिसू शकतो. (२) कर्कवृत्त - हे विषुवृत्त्ताच्या २३ अंश, २६ कला, २२ विकला ( सुमारे साडेतेवीस अंश ) उत्तरेकडं आहे. याच्या उत्तरेकडील प्रदेशातील आकाशात सूर्य कधीही डोक्यावर येत नाही. हिंदुस्थानातील गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोराम, छत्तीसगड, त्रिपुरा आणि झारखंड या राज्यातून कर्कवृत्त जाते. (३) विषुववृत्त (४) मकरवृत्त - हे विषुववृत्ताच्या २३ अंश, २६ कला, २२ विकला ( सुमारे साडेतेवीस अंश ) दक्षिणेकडे आहे. याच्या दक्षिणेकडील प्रदेशातील आकाशात सूर्य कधीही डोक्यावर येत नाही. (५) अंटार्क्टिकवृत्त - याच्या दक्षिणेकडील भागातून मध्यरात्रीचा सूर्य दिसतो. आपण उत्तर गोलार्धात राहतो. पृथ्वीचा अक्ष साडेतेवीस अंशानी कललेला आहे. सूर्य २१ मार्च आणि २३ सप्टेंबर या दोनच दिवस विषुववृत्तापाशी येतो. २१ जूनला तो जास्तीतजास्त उत्तरेकडं कर्कवृत्तापाशी दिसतो. तर २२ डिसेंबरला सूर्य जास्तीतजास्त दक्षिणेकडं मकरवृत्तापाशी दिसतो. तारका आणि ग्रह वैषविक वृत्ताच्या उत्तरेकडं किंवा दक्षिणेकडं असतात. तारका आणि ग्रह यांच्या या कोनात्मक अंतराला ‘क्रांती‘ म्हणतात.

काय आहे शून्य सावलीचं रहस्य : मुंबई परिसराचे उत्तर अक्षांश सुमारे १९ अंश आहेत. सूर्याची क्रांती ज्यादिवशी उत्तर १९ अंश होईल त्या दिवशी दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर दिसेल. वर्षातून असा सूर्य दोनदा बरोबर डोक्यावर दिसतो. त्यामुळं या दिवशी माध्यान्हाला सूर्य डोक्यावर आल्यावर आपली सावली बरोबर पायाखाली आल्यामुळं दिसू शकत नाही. म्हणून या दिवसाना ‘शून्य सावली दिवस‘ म्हणतात. मे महिन्यात आकाश निरभ्र असल्यानं ‘शून्य सावली‘ आपणास अनुभवता येते. पण दुसरा दिवस जुलै महिन्यात पावसाळ्यात येत असल्यानं शून्य सावलीचा अनुभव घेता येत नाही.

संशोधन करण्याची गोडी लहान वयातच लागावी : सूर्याची क्रांती आपल्याकडील मोठ्या पंचांगातून दिलेली असते. स्थानिक अक्षांशाएवढी ती ज्या दिवशी असेल तो दिवस शून्य सावलीचा मानावा. वेळ दुपारी सूर्य आकाशात डोक्यावर आल्याची समजावी. सूर्यास्ताच्या वेळेतून सूर्योदयाची वेळ वजा करावी त्या कालावधीचा अर्धा भाग सूर्योदयाच्या वेळेत मिळवावा म्हणजे सूर्य आकाशात डोक्यावर येण्याची वेळ समजेल. विद्यार्थी भूगोल विषय पुस्तकातच शिकतात. विषय पाठ करून मार्कही मिळवितात. पण भूगोल पुस्तकात तसाच राहतो. निरीक्षणशक्ती, विचारशक्ती वाढविणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रयत्न व्हावयास पाहिजेत. शिक्षकांना तसंच पालकांना हे शक्य आहे. शून्य सावलीच्या दिवशी त्यांना शून्य सावलीचं निरीक्षण करायला लावून त्यांना जर उत्तरायण आणि दक्षिणायन वगैरे गोष्टी समजावून सांगितल्या तर त्यांना या गोष्टी सहजपणे समजू शकतील. विशेष म्हणजे त्यांना या विषयाची गोडी लागून ते अधिक निरीक्षणे करू लागतील. ती एक सवयच होऊन जाईल. या विषयात गोडीही निर्माण होईल. आपल्या घराच्या खिडकीतून येणाऱ्या सूर्य किरणांची जागा कशी बदलते?, सूर्य पूर्व क्षितिजावर एकाच ठिकाणी का उगवत नाही?, ऋतूंमध्ये बदल कसा होतो ? पृथ्वीचा अक्ष जर साडेतेवीस अंशानी कललेला नसता तर काय झालं असतं? इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधून काढायचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करायला हवा. मूलभूत संशोधन करण्याची गोडी लहान वयातच विद्यार्थ्यांना लावली गेली पाहिजे. तरच या हिंदुस्थानात उद्यांचे शास्त्रज्ञ निर्माण होतील.



करावयाचे प्रयोग : शून्य सावली दिसण्याच्या दिवशी सकाळी ११ वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांनी निरीक्षण करायला सुरुवात करावी. पुठ्याचं एक जाड नळकांडं तयार करून उन्हांत ठेवावं. किंवा एक जाड काठी उन्हात उभी करून ठेवावी. तिच्या सावलीचं निरीक्षण करावं. काठीच्या सावलीची लांबी कमीकमी होत जाईल. ठीक १२ वाजून ३५ मिनिटांनी सूर्य आकाशात डोक्यावर आला म्हणजे सावली काठीच्या मुळाशी आल्यामुळं अदृश्य होईल. नंतर पुन्हा काठीची सावली लांब लांब होत जाईल. मुलांच्या एका गटानं उन्हात गोलाकार उभे राहून एकमेकांचे हात धरून कडे करावे. नंतर सावलीचे निरीक्षण करावं. आकाशात सूर्य डोक्यावर आल्यानंतर सुंदर दृश्य दिसेल. याचा उंचावरून फोटो घेता येईल. शून्य सावलीचे निरीक्षण करण्याची संधी आपणास महाराष्ट्रात मिळू शकते.

प्रत्येक गोष्टीमागे वैज्ञानिक कारण : कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील प्रदेशातून हा अनुभव घेता येणारच नाही. कारण त्या प्रदेशातून सूर्य आकाशात डोक्यावर आलेला दिसतच नाही. तसेच मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील भागातून हे दृश्य अनुभवता येणारच नाही. सूर्याकडे कधीही साध्या डोळ्यांनी पाहू नये. त्यासाठी ग्रहणचष्म्याचा वापर करावा. शून्य सावलीचा अनुभव घेतांना सूर्याकडं पाहण्याचा प्रश्नच नसतो. शून्य सावलीच्या दिवशी दुपारी आकाशात सूर्य ठीक डोक्यावर आल्यावर उन्हात उभे राहून सर्वांनी आपली सावली अदृश्य कशी होते याचा नक्कीच अनुभव घ्यावा. निसर्गातील हे रहस्य समजून घेतल्यामुळं नक्कीच आपण आनंदाचे साक्षीदार होऊ शकाल. निसर्गात चमत्कार नावाची गोष्टच नसते. प्रत्येक गोष्टीमागे वैज्ञानिक कारण असते. आपण या गोष्टींमागचा कार्यकारणभाव समजून घेणं जरूरीचं आहे. यामुळं मनातील अंधश्रद्धा कमी होऊन मग आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करू लागतो. आपणास तशी सवयच होऊन जाते.

हेही वाचा -

  1. Lunar Eclipse : चंद्रग्रहण समज आणि गैरसमजावर लीना बोकील यांची उपयुक्त माहिती, भारतात ५ मे रोजी दिसणार चंद्रग्रहण
  2. Nov 8 Lunar Eclipse : जगाला आकाशात दिसणार रोमांचकारी 'ब्लड मून'; देशातील या ठिकाणी दिसणार चंद्रग्रहण
  3. नंदुरबारकरांनी अनुभवला शून्य सावलीचा प्रयोग

ABOUT THE AUTHOR

...view details