छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात राहणाऱ्या शुभदा पैठणकरचे पालक शिक्षक आहेत. तिला एक बहिण आणि एक भाऊ आहे. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या या मुलीनं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेतील शाळेत घेतले. त्यानंतर जालना जिल्ह्यात मराठी शाळेत पाचवी ते दहावी शिक्षण घेतले. ती अभ्यासात हुशार असल्याने तिनं डॉक्टर व्हावं, असं आई-वडिलांना मनोमन वाटत होतं. मात्र रक्त पाहून शुभदाला त्रास होत असल्यानं डॉक्टर व्हायचं नाही, असं तिनं ठरवलं होतं. ती आठवीत असताना वडिलांनी घरी संगणक आणला. त्यातच तिला तिच्या पुढील आयुष्यासाठी मार्ग मिळाला.
अमेरिकेत शिक्षणाची मिळाली संधी : अमेरिकेत पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय तिने घेतला. तिनं पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तिला तेथीलच एका युवकाचा विवाहासाठी प्रस्ताव आला. तिने आपल्या होणाऱ्या पतीला शिक्षणाविषयी आपला मानस व्यक्त केला. त्यावर त्याने होकार दिला. त्यामुळे तिचा अमेरिकेत शिक्षण घेण्याचा मार्ग आणखीन सुकर झाला. शुभदा हिने दोन वर्षाचा अमेरिका येथे सिलिकॉन व्हॅली येथे असलेल्या एका नामांकित विद्यापीठामध्ये सोप्टवेअर इंजिनिअरिंग क्लाऊड अँड वर्चलायझेशनमध्ये स्पेशलायझेशन केला. त्याच दरम्यान अनेक कंपन्यांच्या निवड चाचण्या होत होत्या. अमेरिकेत नोकरी करण्यासाठी अनेक अवघड टप्पे पार करावे लागतात. जवळपास सात ते आठ टप्पे पूर्ण करावे लागतात. त्याच दरम्यान शुभदा हिने एका नामांकित कंपनीत मुलाखत दिली होती. त्यात तिची निवड करण्यात आली आहे. तिला वार्षिक दीड कोटी रुपयांचे मानधन मिळणार आहे.
मानव विरहित वाहने पाहून घेतली प्रेरणा : शुभदा ही पुण्यात नामांकित कंपनीत काम करत असताना प्रसारमाध्यमांवर तिने मानवरहित चालणारी कार पाहिली. तिला या तंत्रज्ञानाविषयी उत्सुकता निर्माण झाली. हे तंत्रज्ञान कसं काम करत असेल, कशा पद्धतीने या सर्व गोष्टी होत असतील असा प्रश्न तिला पडला. याबाबत शिक्षणात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यातच मानवी मेंदूवर काम करण्याचा तिचा मानस होता. अमेरिकेत या तंत्रज्ञानावर सर्वाधिक काम केले जाते. त्यामुळेच तिथे पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचा निर्णय तिने घेतला. याबाबत तिने इंटरनेटच्या माध्यमातून तपास केला. सिलिकॉन व्हॅलीमधील अभ्यासक्रम निदर्शनास पडला. त्याबाबत तिने प्रवेश घेण्यासाठी परीक्षा दिल्या होत्या. त्यात ती उत्तीर्ण झाल्यावर तिला शिक्षण घेता आलं.
कुटुंबीयांना झाला आनंद :सामान्य कुटुंबातील मुलगी अमेरिकेत जाऊन शिक्षण घेते. तिथेही ती अव्वल ठरते, याचा कुटुंबीयांना आनंद झाला. शुभदा लहानपणीपासूनच हुशार होती. स्पर्धा परीक्षा, वादविवाद स्पर्धा आणि इतर स्पर्धांमध्ये ती सहभागी होत असताना नेहमी अव्वल राहिली. छत्रपती संभाजीनगर शहरात उच्च शिक्षण घेऊन पुण्यात नोकरी मिळवली. त्यानंतर अमेरिकेत उंच झेप घेतली. तिला पदवी प्राप्त झाली त्यावेळी अमेरिकेच्या विद्यापीठात तिचं नाव उच्चारलं गेलं. तेव्हा सर्वाधिक आनंद झाल्याची आठवण तिचे वडील संजय पैठणकर यांनी सांगितली. तर तिच्या आईनंदेखील शुभदाच्या या प्रवासाबद्दल समाधान व्यक्त केलं.
हेही वाचा :
- सारा अली खाननं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला दिली भेट; पाहा फोटो
- भारत न्याय यात्रेत राहुल गांधींसह 'या' नेत्यांवर गुन्हा दाखल, काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल