नाशिक Nashik Crime News : वादाच्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे नाशिक शहर हादरलं आहे. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी नाशिकच्या सिन्नर फाटा परिसरात एका 40 वर्षीय तरुणाची भर रस्त्यात लोखंडी रॉडनं मारहाण करत हत्या करण्यात आली तर दुसऱ्या घटनेत अंबड भागात दोन गटातील वाद मिटवण्यास गेलेल्या पोलीस निरीक्षकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यात ते जखमी झालेत. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं यावरून दिसून येत आहे.
नेमकं काय घडलं: नाशिकच्या सिन्नर फाटा येथे जमिनीच्या वादातून प्रमोद केरु वाघ( वय 40) या तरुणाची भररस्त्यात लोखंडी सळईनं मारहाण करत हत्या करण्यात आली. या घटनांनंतर संशयित योगेश पगारे आणि सद्दाम मलिक हे दोघे फरार झाले. हत्येची सर्व घटना बाजूच्या एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
शहरात गुंडांची दहशत: नाशिक शहरात गुंडांची मजल इतकी वाढली आहे की, आता पोलिसांवर देखील हल्ले करण्यास गुन्हेगार मागं-पुढं पाहत नाही. अशीच घटना नाशिकच्या अंबड परिसरात घडली. जागेचा ताबा मिळवण्यावरून दोन गटात वाद झाला वडीलोपार्जित जागा बिल्डरला विकण्यात आली आहे. मात्र, ज्याच्या नावावर जागा आहे त्याचं निधन झालं असून बिल्डरनं आमच्या खोट्या सह्या घेऊन जागेचा व्यवहार करून तेथे गाळे बांधले असा वाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. अशात 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी बिल्डर माणिक सोनवणे आणि गाळेधारक गाडे कुटुंबात वाद झाला. एका महिलेनं या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्यावर गाडे कुटुंबातील काही जणांनी जीवघेणा हल्ला केला. यात पवार यांच्या दोन्ही हातात गंभीर इजा झाली. पवार यांना वाचवण्यासाठी पुढं सरसावलेल्या उपनिरीक्षक सविता मुंडे यांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर उपस्थित गुंडांनी पोलीस पथकावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.