महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हेडफोनने घेतला आणखी एका तरुणीचा बळी, तंद्रीत रुळ ओलांडताना रेल्वेनं चिरडलं - GIRL DIES DUE TO HEADPHONES

पालघरमध्ये हेडफोनने एका तरुणीचा बळी घेतलाय. रुळ ओलांडताना इयरफोन कानात असल्यानं तिला ऐकू आलं नाही आणि रेल्वेनं उडवलं.

वैष्णवी रावल
वैष्णवी रावल (File image)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2025, 2:13 PM IST

Updated : Jan 25, 2025, 3:16 PM IST

पालघर -हेडफोन कानात घालून गाणी ऐकत चालणे जीवावर बेतण्याचे प्रसंग वारंवार घडूनही त्यातून तरुणाई बोध घेताना दिसत नाही. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना किंवा रस्त्याने चालताना हॉर्नच्या आवाजांकडे होणारं दुर्लक्ष त्यांचे बळी घेत आहे. देशभरात दरवर्षी इयरफोन लावून रेल्वेरुळ ओलांडल्याने किमान पन्नास बळी जातात असं रेल्वे पोलिसांची आकडेवारी सांगते. पालघरमध्येही असाच एका तरुणीचा काल बळी गेला.

सध्याच्या मोबाईल युगात महाविद्यालयीन विद्यार्थी तरुण-तरुणी कानात इयरफोन घालून मोठ्या आवाजात गाणी ऐकत प्रवास करत असतात. इयरफोन घातल्यामुळे त्यांना आजूबाजूचा आवाज ऐकू येत नाही. आजूबाजूला काय चालू आहे हे समजत नाही. रेल्वेरुळ अथवा रस्ता ओलांडताना त्यांना गाड्यांचे आवाज अथवा रेल्वेच्या हॉर्नचे आवाजही ऐकू येत नाहीत. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो, असं यासंदर्भातील आजपर्यंतच्या प्रकरणात तपासावरुन स्पष्ट झालं आहे.


पादचारी पूल नसल्याने बळी - पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाजवळ माकणे गावातील सोळा वर्षीय विद्यार्थिनी वैष्णवी रावल ही इयरफोन लावून, गाणे ऐकत रेल्वेरूळ ओलांडत होती. त्याचवेळी गुजरातकडे जात असलेल्या राजधानी एक्सप्रेसचा तिला आवाज आला नाही. या एक्सप्रेसची धडक बसून तिचा जागीच मृत्यू झाला. माकणे परिसरात रेल्वेचा रुळ ओलांडण्यासाठी पादचारी पूल नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना धोकादायक पद्धतीने रुळ ओलांडावे लागतात, अशी लोकांची तक्रार आहे. हे रुळ ओलांडताना विद्यार्थी मोबाईलचा इयरफोन लावून गाणी ऐकत किंवा फोनवर बोलत चालत असतात. त्यातून असे अपघात होतात, असं पोलिसांनी म्हटलय.

पादचारी पुलासाठी दबाव - वैष्णवीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे प्रशासनाने आता स्थानिक रहिवाशांच्या मागणीचा विचार करून रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी पादचारी पूल तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आता नागरिकांचा दबाव वाढला आहे. वैष्णवीच्या मृत्यूमुळे नागरिक संतप्त झाले असून स्वयंसेवी संस्था तसंच नागरिक आता या प्रश्नावर आवाज उठवत आहेत. त्याचबरोबर रेल्वे, पोलीस तसंच स्वयंसेवी संस्था किंवा नागरिकांनी आता इयरफोनच्या वापराबाबत नागरिकांमध्ये अधिक जागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

यापूर्वीचे इयरफोनचे बळी - यापूर्वी नितेश चौरसिया या तरुणाचा याच ठिकाणी कानात इयरफोन घालून रेल्वे रुळ ओलांडताना अपघात झाला होता आणि त्यातच त्याला त्याचा जीव गमवावा लागला. ज्यांनी नागरिकांना सावध करायचे आणि स्वतः सावध राहायचे, अशा पोलिसानेच कानात हेडफोन लावून गाणी ऐकत चालताना लोकलचा आवाज न आल्याने धडक बसून रवींद्र हाके या हवालदाराचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेही गेल्या काही दिवसापूर्वी दोन तरुणांचे जीवन एकाच वेळी हेडफोनमुळे संपले. रेल्वे ट्रॅकवर कानात हेडफोन घालून हे दोन तरुण चालत होते. पाठीमागून येणाऱ्या गाडीचा त्यांना आवाज न आल्यामुळे तिच्या धडकेने त्यांचा मृत्यू झाला.

आयुष्याचा शेवट रुळावर - वास्तविक वाहन चालवताना किंवा रस्त्याने चालताना हेडफोन वापरणे हा गुन्हा असताना त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहात नाही. त्यामुळे अनेकांच्या आयुष्याचा शेवट रेल्वे रुळावर किंवा रस्त्यावर होतोय. डॉक्टरांनीही हेडफोनचा वापर करणे धोकादायक असल्याचं निदर्शनास आणलं आहे. हेडफोनच्या वापरामुळे बहिरेपणा येतो तसंच कानाचे अनेक विकार होतात, असे कानतज्ञ सांगत असतानाही त्याकडे होणारे दुर्लक्ष आपल्या जीवावरच बेतते. हेडफोन आणि हेडफोनचा वापर मर्यादित काळासाठी करण्यासाठी आता समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा...

  1. कानात हेडफोन घालून रेल्वे रुळावरून चालणं जीवावर बेतलं; रेल्वेच्या धडकेत पोलीस हवालदाराचा मृत्यू
  2. Girl Died In Train Accident In Nagpur : अनेकांनी दिला आवाज मात्र हेडफोनने केला घात, रेल्वेच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
Last Updated : Jan 25, 2025, 3:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details